ठाणे : ठाणेकरांना स्टेमकडून मिळणारे वाढीव १० एमएलडी पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार नसून ते संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पाण्याच्या मुद्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ते घोडबंदरलाच मिळणार असल्याचा दावा केला हाेता.महापौरांच्या उपस्थितीत बुधवारी स्टेमच्या अधिकाऱ्यांबरोबर ठाण्याला वाढीव १० एमएलडी पाणी मिळावे, यासाठीच्या बैठकीत ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावे, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर, गुरुवारी पुन्हा स्टेमच्या अधिकाऱ्यांनी महापौरांंची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीतही दोन दिवसांत वाढीव पाणी मिळाले नाही, तर जेसीबी लावून खेचून आणू, असा सज्जड दमच दिला. त्यामुळे ठाणेकरांना लवकरच हे पाणी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले.दरम्यान, गुरुवारी डुंबरे यांनी हे वाढीव पाणी घोडबंदरला मिळणार असल्याचा दावा करून आपणच सतत पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, या मुद्यावरून महापौरांना छेडले असता केवळ घोडबंदरसाठी हे पाणी नसून ते संपूर्ण ठाणेकरांसाठी मिळणार असल्याचा दावा करून उगाचचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी करू नये, असा टोलाही लगावला. केवळ पत्रकबाजी करून, निवेदन देऊन ही कामे होत नसून त्यासाठी बैठकीला हजर राहून चर्चादेखील करावी लागते, असे खडेबोलही सुनावले. दुसऱ्यांचे श्रेय घेण्याची सवयच भाजपवाल्यांना लागली असल्याने त्यांना इतर प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचेही महापौर म्हणाले. आता पाण्याच्या मुद्यावरून ठाण्यात पुन्हा सेना विरुद्ध भाजप अशी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
ठाणे महापालिका : वाढीव १० एमएलडी पाण्यावरून भाजप-सेनेत श्रेयवादाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 11:41 PM