ठाणे : राज्य शासनाने थिएटर आणि नाट्यगृहे सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी अजूनही प्रेक्षकांची नाट्यगृहाकडे पावले वळली नसल्याने नाट्यग्रृहांचे भाडे केवळ 25 टक्केच घ्या , अशी मागणी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी केली आहे. यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट देखील घेतली. नरेश म्हस्के यांनी देखील नाट्य संस्था आणि प्रशांत दामले यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन महापालिकेने त्यानुसार आता आध्यादेश काढला असून त्यानुसार नाटय़गृहाचे भाडे आता २५ टक्केच आकारले जाणार आहे.
देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेंतर्गत राज्य शासनाने नाट्यगृहे सुरु करण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीची गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणोकर ही दोन नाट्यगृहे असून लॉकडाऊनच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून ही नाट्यगृहे बंदच होती. मात्र, आता नाट्यगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली असल्याने दोन्ही नाट्यगृहाची सफाई देखील करण्यात आली आहे. मात्र, केवळ ५० टक्के क्षमतेनेच नाट्यगृहे सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्याने म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग मिळालेला नाही. त्यामुळे नाट्यसंस्था देखील आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. यासाठी सोमवारी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन नाट्यगृहांना जे भाडे आकारण्यात येते ते केवळ २५ टक्केच भाडे देण्याची मागणी प्रशांत दामले यांनी केली आहे.
या भेटीमध्ये त्यांनी नाट्यसंथाच्या आर्थिक अडचणी महापौरांना सांगितल्या. एक तर 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरु ठेवायची आहेत, आधीच प्रेक्षक घाबरून ५० टक्के सुद्धा येत नसल्याने कोरोनाच्या काळात नाट्यगृहांचे पूर्ण भाडे परवडत नसल्याचा मुद्दा दामले यांनी महापौरांकडे मांडला. महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे आणखी काही संस्थांनी अशाच प्रकारे मागणी केली होती. त्यामुळे नाट्यसंस्थांना मदतीचा हात मिळावा यासाठी जोपर्यंत कोरोना काळ सुरु आहे तोपर्यंत २५ टक्केच भाडे आकारण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे. त्यानुसार आता ठाणो महापालिकेने त्या संदर्भातील आध्यादेश काढला असून २५ टक्के भाडे आकारले जाणार आहे.
सध्यस्थितीत गडकरी रंगायतनचे तिकीट भाडे किमान ५० रुपये ते कमला १५० रुपये आहे. तर घाणेकर नाटय़गृहाचे कमाल भाडे ५० ते १५० रुपये आहे. परंतु सध्याची आर्थिक स्थिती पाहता नाटय़व्यवसाय सुरु राहावा व मराठी नाटय़संस्था कार्यरत राहाव्यात या दृष्टीकोनातून दोन्ही नाटय़गृहांसाठी नाटकांचे कमाल दर ४०० पर्यंत मर्यादीत ठेवण्यास व तिकीट दरापर्यंत मुळ भाडे २५ टक्के इतके आकारण्यास तसेच ज्यावेळेस तिकीट दर ४०० रुपये पेक्षा जास्त आकारण्यात येईल त्यावेळेस नियमानुसार नियमित भाडे आकारण्यात येणार असल्याचे या आध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.