ठाणे - ठराव मंजुर होत नाहीत, सचिव विभागाकडून ठराव पुढे सरकत नाहीत, असा काहीसा गवगवा मागील कित्येक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. परंतु आता सुमारे ४० ते ४५ ठराव अद्यापही प्रशासनकडे आलेच नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांनी मात्र आमच्याकडून ठराव पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ठराव प्रशासनाकडे पोहचलेच नसल्याने ते गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिकेची दर महिन्याला २० तारखेला महासभा होत असते. या महासभेत प्रशासनाच्या विविध प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येत असतात. काही प्रस्तावांवर सभागृहात साधकबाधक चर्चा होत असते. त्यानंतर सुचनांसह प्रस्ताव मंजुर केले जातात. काही प्रस्ताव नव्याने सादर करण्यासाठी सांगितले जाते. परंतु असे होऊनही प्रशासनाकडूनच ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही. काही ठराव शासनाकडे नियोजीत वेळेत पाठविले जात नाहीत. अशी ओरडही महासभेत होतांना दिसून आली आहे. दरम्यान वारंवार ही ओरड होत असल्याने, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहाकडून आलेले ठराव मंजुर करुन पुढे पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या संबधींत विभागाकूडन त्या सुचनांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. परंतु मागील तीन महिन्यात झालेल्या महासभेतील सुमारे ४० ते ४५ ठराव हे अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पत्रकारांच्या घरांसह, सीसीटीव्ही, आदींसह काही महत्वांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे कोणतेही ठराव नसून आम्ही सर्वच ठराव मंजुर करुन प्रशासनाकडे पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु प्रशासन मात्र हे ठराव अद्यापही प्राप्त न झाल्याचे सांगत आहे. त्यामुळे हे मग हे ठराव गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक राहिलेले नाहीत. माझी स्वाक्षरी होऊन ते ठराव पुढे गेले आहेत. - (मीनाक्षी शिंदे - महापौर, ठामपा)
आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक नाहीत. आम्ही वेळेत ठराव प्रशासनाकडे पाठविले आहेत. - (नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा)