ठाणे : देशातील मंदीचा फटका आता उद्योजक, व्यावसायिकच नव्हे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही बसू लागला आहे. यामुळे पहिल्या सहामाहीत अपेक्षित उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यास नाकीनऊ आल्याने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर, पाणीकर, शहर विकास विभाग, अग्निशमन दल या विभागांशिवाय उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत शोधण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. सद्य:स्थितीत मालमत्ताकर, पाणीकर, शहर विकास विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जाहिरात विभाग, एलबीटी आदी महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.पण, याशिवाय नवीन कुठले उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीमध्ये उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी आणि कार्यकारी अभियंता विकास ढोले यांचा समावेश आहे. या समितीच्या अभ्यासावर पुढील कार्यवाही ठरणार आहे.निवडणुकीनंतर समिती करणार अभ्यास- निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ही समिती इतर कोणते उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील, याबाबत अभ्यास करणार आहे. त्याशिवाय, इतर राज्यांमध्ये, इतर शहरांमध्येही या पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांशिवाय इतर कुठले स्रोत आहेत का, त्याच्या माध्यमातून कसे उत्पन्न वाढविता येईल, याचाही अभ्यास करून आपला अहवाल ती महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे.दरम्यान, शहरातील ज्या मालमत्तांना कर लावला जात नाही, त्यांचाही शोध घेऊन त्यांना कर लावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला केल्या.
ठाणे महापालिकेला मंदीचा फटका; आयुक्तांनी गठीत केली समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 2:27 AM