ठाणे - कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने सतर्क रहावे. ठाणे महापालिका हद्दीत आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी टेस्ट सेंटर सुरू करावेत. ठाणे महापालिकेची पार्किंग प्लाझा व व्होल्टास या कोविड रुग्णालयात सर्व तयारी ठेवणे, औषधसाठा, साफसफाई, लसीकरण आदींबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देत असतानाच ठाणे महापालिका कोविडच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असेही प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज झालेल्या बैठकीदरम्यान नमूद केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते.
ठाणे महापालिका हद्दीत लसीकरणाबाबत हर घर दस्तक ही मोहिम सुरू असून ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वानी मास्क वापरणे गरजेचे असून याची अंमलबजावणी सर्व कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये करण्याच्या सूचना यावेळी सहाय्यक आयुक्तांना दिल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी आरटीपीसीआर सेंटर सुरू करावे. त्याचप्रमाणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई दिवसांतून चार ते पाच वेळा करुन घ्यावी. गृहसंकुलांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्या ठिकाणच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या बैठकीदरम्यान दिल्या. तसेच बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी यावेळी दिल्या.
सद्यस्थितीत मास्क व सोशल डिस्टन्सींगचा वापर होताना दिसत नाही. परंतु कोविडच्या चौथ्या लाटेची पार्श्वभूमी लक्षात घेवून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, ज्या नागरिकांचे अद्याप एकही लसीकरण झाले नाही अथवा बूस्टर डोस झालेला नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 'हर घर दस्तक' ही मोहिम सुरू असून महापालिकेचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे व ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.