ठाणे : पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प केलेल्या ठाणे महापालिकेनेच आता वृक्षतोडीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरण सदस्यांचा विरोध डावलून शुक्रवारी वसुंधरा दिनाच्या दिवशीच रस्ता रुंदीकरणात आड येणाऱ्या १४०० झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. शुक्र वारी जगभर वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध ठिकाणी अनेक कार्यक्र म राबवण्यात आले होते. ठामपानेही शुक्र वारपासून अर्थ केअर प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. यासंदर्भातील प्रस्तावही केंद्राला सादर केला आहे. परंतु, असे असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये रस्ता रुंदीकरणातील सुमारे १४०० झाडांच्या कत्तलीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला मनसेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांनी हरकत घेतली. निदान वसुंधरा दिनाच्या दिवशी तरी हा प्रस्ताव मंजूर करू नये, असा मुद्दा उपस्थितीत करून ज्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, ती झाडे योग्य जातीची आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला. मात्र, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी तुम्हाला बोलायला परवानगी दिल्यानंतरच बोला, असे सांगून गप्प राहण्याचे फर्मान सोडल्याने आपण सभात्याग केला असल्याची माहिती मोरे यांनी दिली. एका महिला सदस्याचा अशा प्रकारे आवाज दाबून प्रशासनाने जबरदस्तीने हा प्रस्ताव मंजूर केल्याचे त्या म्हणाल्या.रस्ता रुंदीकरण मोहिमेत अनेक झाडांची कत्तल होणार आहे. या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा दावा पालिकेने केला असला तरी यामधील अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करून मोरे यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. पालिका जरी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा करीत असली तरीदेखील मोरे यांना दिलेल्या लेखी उत्तरात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या वृक्षाचे प्लेल्टोफोरम हे ट्रान्सपरंट होऊ शकत नसल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे जर पुनर्रोपण होणारच नसेल तर या वृक्षांची कत्तल कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिकाच १४०० झाडांच्या मुळावर
By admin | Published: April 23, 2016 1:55 AM