महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीसाठी यंदा ७४० कोटींचे वसुलीचं लक्ष्य दिले होते. त्यापैकी ४३९.२४ कोटी म्हणजे ५९ टक्के वसली आतापर्यंत झाली असून गेल्या वर्षांच्या तुलनेत ती १०५ कोटींनी जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यावर्षी वसुलीसाठी मुख्यालयाकडून विशेष हातभार लागला आहे.
मुंब्रा आणि दिवा वगळता इतर प्रभाग समिती मार्फत त्यांना दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ५७ ते ६२ टक्के वसुली झाली आहे. सर्वात जास्त लक्ष्य हे माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीला २००.४१ कोटींचे देण्यात आले असून त्यांनी १२४.१३ कोटींची वसुली पूर्ण करून ठामपाच्या नऊ प्रभाग समितीमध्ये आघाडी घेतली आहे. यंदा मालमत्ता विभागाला ७४० कोटींचे वसुली लक्ष्य दिले होते. ते मार्चपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार आखणी करून विविध उपाययोजना करून वसुली सुरू केली. वेळप्रसंगी कठोर पाऊलही उचलावे लागले. त्यामुळे ७ डिसेंबरपर्यंत दिलेल्या टार्गेटच्या ५९ टक्के वसुली करून चांगलीच झेप घेतली आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाच लाख ४३ हजार ५२० मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख तीन हजार ३११ मालमत्ताधारक हे माजीवडा-मानपाडा या प्रभाग समितीअंतर्गत असून त्यानुसार त्यांना २००.४१ टक्क्यांचे टार्गेट दिले होते. त्यापाठोपाठ वर्तकनगर, नौपाडा-कोपरी या प्रभाग समिती असून त्या दोन्ही समितींना १०० कोटींच्यावर टार्गेट आहे. जसे माजीवडा-मानपाडानेही ६२ टक्के टार्गेट पूर्ण केले तसे नौपाडा-कोपरीने ६१ आणि वर्तकनगरने ५९ टक्के टार्गेट पूर्ण करून हातभार लावला. दिलेल्या टार्गेटपेक्षा सर्वात कमी वसुली ही दिवा येथून १३.२६ कोटी झाली असून त्यापाठोपाठ मुंब्र्यातून १७.५५ कोटी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या वर्षी या दिवशी ३३४.१२ कोटींची वसुली झाली होती. यंदा ती ४३९.२४ कोटींवर गेली असून, आकडा १०५.१२ कोटींनी जास्त आहे. येत्या चार महिन्यात टार्गेट पूर्ण करण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त वसुली करण्याचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले.