ठाणे – मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर ठाण्यातील वातावरण पेटलं आहे. या कारवाईसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंच जबाबदार असून यामुळे मनसे-शिवसेना यांच्यातील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेने ठाणे महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यावर आता ठाणे महापालिकेने खुलासा केला आहे.
पीपीई किटस् खरेदी, नर्सेसची भरती तसेच ठाणे कोविड हॉस्पिटल एका कंपनीस चालविण्यास देण्याच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे महानगरपालिकेविरुद्ध केलेले आरोप निराधार आणि महापालिकेचे बदनामी करणारे आहेत असा खुलासा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. अडीच महीने जुनी असलेल्या कंपनीला ठाणे कोविड रुग्णालय चालविण्यास देण्याबाबत त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना महापालिकेने याबाबत विहित कार्यपध्दती अवलंबून अटी आणि शर्तीचे पालन करणऱ्या पात्र कंपनीला हे काम दिले आहे. त्याचबरोबर ही कंपनी मुंबईमध्ये जवळपास 20 कोविड हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा देत आहे. मुळातच कोविड हा साथ आजार नवीन असल्याने त्यासाठी 3 वर्ष जुने कंपनीचा अनुभव गृहित धरणे अभिप्रेत नाही असे स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे कोरोना रुग्नांना चांगले उपचार देता यावेत, प्रभावी व्यवसथापने व्हावे तसेच मृत्यूदर कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीपीई किट्स बाबतीत त्यांनी केलेले आरेाप निराधार आहेत हे स्पष्ट करताना महापालिकेने विहीत कार्यपध्दती अवलंबूनच पीपीई किट्स खरेदी केले आहेत. तसेच त्याचे नमुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तज्ञ समितीने तपासल्यानंतरच अंतिम करण्यात आले आहेत असे सांगितले. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे देयक अदा करण्यात आले नाहीत असेही स्पष्ट केले.
दरम्यान, नर्सेसच्या नियुक्तीबाबतही महापालिकेने आपले धोरण स्पष्ट केले असून त्यांच्यावर कुठलाही अन्याय केलेला नाही असे सांगितले. मुलत: त्यांची नियुक्ती ही केवळ कोविड पुरतीच मर्यादित असून त्यांना मानधनावर घेण्यात आले आहे. सदरचे रुग्णालय आता दुसऱ्या कंपनीला व्यस्थापनासाठी दिले असल्याने त्यांना त्यांच्या आस्थापनेवर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.