ठाणे : प्रभाग समितीपाठोपाठ विशेष समित्यांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचीच चलती दिसून आली. शिवसेनेने या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून एक समिती राष्ट्रवादीला दिली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने आगामी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाचपैकी चार समित्या शिवसेनेकडे आणि एक समिती राष्ट्रवादीच्या वाटेला आली आहे. या निवडणुकीतही भाजपने उमेदवारी अर्ज न भरल्याने या पाच समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे.महापालिकेच्या पाच विषेश समिती सभापतीपदाची निवडणूक तब्बल दीड वर्षानंतर ११ डिसेंबर रोजी होणार असून ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानुसार महिला बालकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीच्या राधाबाई जाधवर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर गलिच्छ वस्ती सुधारणा समिती साधना जोशी, आरोग्य परीक्षण समिती निशा पाटील, क्रीडा समाजकल्याण प्रियंका पाटील आणि शिक्षण समितीसाठी योगेश जाणकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपने अर्ज दाखल केला नसल्याने या पाचही सभापतींची औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र आली होती. त्या वेळी शिवसेनेने एक समिती ही राष्ट्रवादीला दिली होती. विशेष समित्यांच्या निवडणुकीतही शिवसेनेचे सर्व समित्यांवर वर्चस्व असतानाही एक समिती राष्ट्रवादीला दिली आहे. आम्ही आघाडी धर्म पाळला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. आता ठाण्यात आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे. याची चिंता भाजपला अधिक सतावत असून त्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष समित्यांवरही महिलाराजप्रभाग समित्यांवर यापूर्वीदेखील महिलाराज पाहावायस मिळाले आहे. त्यानंतर आता विशेष समित्यांच्या निवडणुकीतही महिलाराज पुन्हा एकदा दिसून आले. शिवसेनेने चारपैकी तीन समित्या महिलांना दिल्या आहेत. तर राष्ट्रवादीनेदेखील एका महिलेला संधी दिली आहे. त्यानुसार पाचपैकी चार समित्यांवर महिलाराज आले आहे.
ठाणे मनपा : विशेष समित्यांवर शिवसेनेचीच पकड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 1:18 AM