ठाणे : कोरोना हॉस्पिटलमधील बेड मिळविण्यात त्रस्त झालेल्या ठाणेकरांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर घरातच थांबलेल्या रुग्णांची केवळ एका फोनवर विचारपूस व सल्ला देण्यासाठी ठाणे महापालिका प्रती कॉल १५ रुपये मोजणार आहे. दररोज ६ हजार फोन कॉलचे कंत्राट महापालिका प्रशासनाने प्रदान केले असून, कॉलसेंटर कंपनीला ५४ लाख रुपये दिले जाणार आहेत. या कॉलसेंटरसाठी महापालिकेनेच सात लाख रुपये खर्चून चार डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. दरम्यान, कॉलसेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या उधळपट्टीला भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी तीव्र विरोध केला आहे. (Thane Municipal Corporation spends Rs. 15 for a phone questioning citizens!)
कोविडची दुसरी लाट ओसरत आली आहे. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेचाही ठाणेकरांना तडाखा बसला. प्रत्येक रुग्णाला बेड देण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरले. भरलेले ग्लोबल हॉस्पिटल, ऑक्सिजनअभावी रिकामे पार्किंग प्लाझा हॉस्पिटल, कर्मचाऱ्यांअभावी सुरू न झालेले व्होल्टास व कळवा भूमिपूत्र हॉस्पिटल अशी परिस्थिती ठाण्याने पाहिली. मात्र, आता कॉलसेंटरमधून होम क्वारंटाईन रुग्णांची काळजी घेण्याच्या गोंडस नावाखाली महापालिकेच्या प्रशासनाकडून तब्बल ६१ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. होम क्वारंटाईन, को-मॉर्बिड रुग्ण, कोरोनामधून बरे झालेले रुग्ण आणि लस घेतलेल्या नागरिकांची कॉलसेंटरमधून विचारपूस सुरू करण्यात आली आहे. त्यांना गरजेनुसार डॉक्टरांकडून सल्ला दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी महापालिका प्रती कॉल १५ रुपये मोजणार आहे.
दररोज ६ हजार फोनकॉलद्वारे कॉलसेंटर कंपनीला दररोज ९० हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत. एकूण ५४ लाख रुपये कंपनीच्या तिजोरीत जाणार आहेत. या कॉलसेंटरच्या कंपनीवर महापालिका प्रशासनाने कृपादृष्टी ठेवली असून, कॉलसेंटरवरून सल्ला देण्यासाठी महापालिकेनेच चार डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासाठी ७ लाख २० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. अशा प्रकारे अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ६१ लाख रुपयांची महापालिका उधळपट्टी करणार आहे, असा आरोप त्यांनी केला.
कॉलसेंटरसाठी डॉक्टर उपलब्ध कसे?डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेने हॉस्पिटल सुरू केले नव्हते. ग्लोबल हॉस्पिटलमध्येही डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. अशा परिस्थितीत कॉलसेंटरसाठी ४ डॉक्टर कसे उपलब्ध झाले, असा सवाल डुंबरे यांनी केला आहे. एका फोनकॉलसाठी १५ रुपये दर आकारणाऱ्या कॉलसेंटरलाच डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अट का टाकण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
तिजोरीत खडखडाट, पण गांभीर्य नाहीमहापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नाहीत. मात्र, महापालिका प्रशासनाला आर्थिक स्थितीचे गांभीर्य नाही. त्यामुळेच एका फोन कॉलसाठी १५ रुपये दर ठरवून ५४ लाख रुपये खर्चाच्या उधळपट्टीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्यांना परस्पर मंजुरीही दिली जात असून, केवळ महासभेत प्रस्ताव मांडण्याची औपचारिकता केली जात आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली.
हेल्पलाईन नंबर सुरू केल्यास लाखो रुपयांचा खर्च वाचेलठाण्यातील ज्या नागरिकांना डॉक्टरांच्या तातडीने सल्ल्याची आवश्यकता आहे, त्या रुग्णांसाठी महापालिकेने २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. या हेल्पलाईनवर फोन केल्यास नागरिकांना तातडीने मदत पाठविता येईल. त्याचबरोबर महापालिकेचा किमान ५० लाख रुपयांचा खर्चही वाचेल, अशी सुचना डुंबरे यांनी केली आहे. ठाण्यातील रुग्णांच्या मदतीसाठी प्रभाग समिती स्तरावरील डॉक्टरांचे क्रमांकही जाहीर करावेत. त्याचबरोबर मोफत सल्ला देण्याची इच्छा असलेल्या सेवाभावी डॉक्टरांनाही हेल्पलाईनला जोडता येईल, अशी सुचना त्यांनी केली आहे. एकिकडे वॉर रुमसारखी सक्षम यंत्रणा उभारल्याबद्दल महापालिका प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे कॉलसेंटरसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. वॉर रुममार्फत सहजपणे रुग्णांना सल्ला देण्याचे काम होऊ शकते, याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.