ठाणे - मागील कित्येक वर्षापासून रखडलेले फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्यातील सर्वेक्षणात ज्या ५१४१ फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. त्यानुसार आता नौपाड्यातून याला सुरवात झाली आहे. या भागातील फेरीवाल्यांना आता व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसात शहरातील इतर ठिकाणाच्या फेरीवाल्यांना देखील अशाच पध्दतीने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. महापालिकेने स्थापन केलेल्या १६ सदस्यीय फेरिवाला समितीची बैठक तीन वर्षानंतर पार पडली. फेरीवाल्यांमध्ये या धोरणाबाबत विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या व्यवसाय पध्दतीला शिस्त लागावी तसेच फेरीवाल्यांचा सर्वसामान्यांना उपद्रव होऊ नये यासाठी फेरीवाला क्षेत्रांची आखणी करून नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृतरित्या व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी चर्चा बैठकीत झाली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या ५१४१ फेरीवाल्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरते ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी नियमानुसार जागा ठरवून व्यवसाय करण्याची मुभा देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. दरम्यान दुसऱ्या टप्यात शिल्लक राहिलेल्या फेरीवाल्यांचा जागेवर जाऊन बायोमेट्रीक पध्दतीने सर्व्हे केला जाणार असल्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार शहरात सुमारे ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. दरम्यान आता खºया अर्थाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी नौपाडा प्रभाग समितीमधील फेरीवाल्यांना टप्याटप्याने व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे नौपाड्यातील फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून मागील कित्येक महिने यासाठी आंदोलन देखील केले होते. आता त्यांच्या आंदोलनाची फलीत म्हणूनही याकडे पहावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 4:27 PM
फेरीवाला धोरणाची आता खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पहिल्या टप्यातील फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली आहे.
ठळक मुद्देनौपाड्यातून फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवातपहिल्या टप्यात ५१४१ फेरीवाल्यांची नोंदणी