ठाणे - ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाºया ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरिक्षत घरे विनामूल्य मिळणार आहेत. त्यानुसार आता या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरवात केली आहे. सल्लागांराची नेमणूक झाल्यानंतर आता सल्लागार आणि ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांच्या १० टीम तयार करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून शहरातील शाळा, मैदाने, रस्ते, झोपडपट्टी आदींसह इतर माहिती प्रक्रिया गोळा करण्याचे सुरु झाले आहे. ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा पहिल्या टप्यात सामुहीक विकास केला जाणार आहे. त्यानुसार या कामासाठी आवश्यक असलेल्या सल्लागारांची नेमणूकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी किमान ८ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पालिकेने याआधीच त्या दृष्टीने क्लस्टरचा अभ्यास सुरु केला आहे. या वाढीव एफएसआयनुसार झोपडपट्टी भागाला अधिक फायदा होणार आहे. पालिका पुन्हा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अर्बन रिन्युव्हल प्लॅन तयार करणार असून ही योजना कोणत्या भागात कशा पध्दतीने राबविता येऊ शकते याचा अभ्यास करणार आहे. परंतु हा अभ्यास करीत असतांनाच उर्वरित ठिकाणी क्लस्टरची योजना राबविण्यास सुरवात केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ठाणे स्टेशन परिसर आणि वागळे पट्टा यांची निवड करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यामुळेच या भागाचा योग्य पध्दतीने विकास करण्यासाठी पालिका येथे सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु केवळ याच पट्यापुर्ते काम सुरु नसून ठाणे महापालिकेच्या तब्बल ८० अभियंत्यांच्या माध्यमातून आणि सल्लागारांच्या फळीत ३० जण असे मिळून तब्बल १०० हून अधिक तज्ञांची फळी सध्या प्रत्येक प्रभाग समितीत फिरत असून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ते कसे आहेत, मैदान किती आहेत, गार्डन, शौचालये आदींसह इतर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरु असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. दरम्यान दुसऱ्या टप्यात प्रत्येक भागाच्या सीमा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्याची देखील काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचेही पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक विभागाचा आराखडा तयार केला जाणार असून यामध्ये नागरीकांच्या सुचना हरकती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने क्लस्टरचा विकास होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरसाठी पालिकेने सुरु केली माहिती प्रक्रिया सुरु, १० टीम मार्फत काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:00 PM
ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार सल्लागार आणि ठाणे महापालिकेच्या मिळून १० टीम मार्फत माहिती प्रक्रिया गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे.
ठळक मुद्दे महापालिकेचे ८० अभियंत्यामार्फत माहिती प्रक्रियेचे काम सुरुदुसऱ्या टप्यात सिमी निश्चित केल्या जाणार