ठाणे - सौर उर्जेत आघाडीवर असलेल्या ठाणे महापालिकेने आता पीपीपीच्या माध्यमातून महापालिका मुख्यालय, कळवा हॉस्पीटल, टेमघर केंद्र आदींसह इतर ठिकाणी सौर उर्जेद्वारे १० मेगॉवॅट वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणपेक्षा कमी दरात पालिका ही वीज विकत घेणार असल्याने पालिकेच्या वीजेच्या खर्चात वीजेच्या वापरात बचत होणार आहे. येत्या आठ महिन्यात विविध ठिकाणी हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेने सौर उर्जेचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहेत. राज्य शासनाने देखील पालिकेचा या निमित्ताने सलग दोन वर्षे गौरव देखील केला आहे. पूर्वी सौर उर्जेचा वापर कमी प्रमाणात होत होता. परंतु पालिकेने आपल्या मुख्यालयावर, कळवा रुग्णालय, गडकरी रंगायतन आदी ठिकाणी सौर उर्जेचा वापर करुन वीजेची बचत करण्यास सुरवात केली आहे. कळवा रुग्णालयात तर तीन वर्षांची वीज बचत करण्यात आली आहे. आता यापुढे जाऊन पालिकेने पीपीपीच्या माध्यमातून पालिकेच्या ज्या काही महत्वाच्या वास्तु आहेत, त्यांना लागणारी वीज सौर उर्जेच्या नेट मीटरींग पध्दतीचा वापर करुन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पीपीपीच्या माध्यमातून ही वीज निर्मिती केली जाणार असल्याने पालिकेवर हे प्रकल्प उभारण्यासाठी कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून पालिका विविध वास्तुंच्या ठिकाणी १० मेगॉवॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. या ठिकाणी निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार असून ती आपल्या वास्तुसांठी वापरणार आहे. महावितरणकडून सध्या पालिका इमारतींसाठी प्रती युनिट १० रुपये दराने वीज खरेदी करीत आहे. परंतु आता पालिकेला नेट मिटरींगच्या माध्यमातून ६.५५ रुपयाला ही वीज उपलब्ध होणार आहे. त्यानुसार संबधींत ठेकेदाराला या संदर्भातील कार्याध्येश देण्यात आले असून त्याच्याकडून संबधींत वास्तुंचा सर्व्हे सुरु झाला आहे. पुढील १५ वर्षे खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार असून त्यानंतर तो पालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे.१० मेगॉवॅट वीजेच्या माध्यमातून टेमघरच्या रॉ वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्टच्या ठिकाणी ३ मेगावॅट, दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कोपरी एचटीपी प्लॅन्ट, महापालिका मुख्यालय, वागळे इस्टेट प्रभाग समिती, लोकमान्य नर्सींग होम, घाणेकर ड्रामा युनिट, अग्निशमन कार्यालये आदींसह इतर महत्वाच्या ठिकाणी हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
ठाणे महापालिका राबविणार विविध ठिकाणी १० मेगॉवॅट वीजनिर्मिती प्रकल्प, पालिकेला स्वस्त दरात उपलब्ध होणार वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 4:02 PM
ठाणे महापालिकेच्या विविध वास्तुंच्या ठिकाणी आता पीपीपीच्या माध्यमातून सौर उर्जेद्वारे १० मेगॉवॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. महावितरणपेक्षा कमी दरात पालिकेला ही वीज उपलब्ध होणार आहे.
ठळक मुद्देमहावितरणपेक्षा कमी दरात उपलब्ध होणार वीज१५ वर्षे निगा देखभालीची जबाबदारी खाजगी ठेकेदाराची