ठाणे : ठाणे शहरांतर्गत लसीकरण मोहीम अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता पाच लक्ष लसी विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे. आता ग्लोबल टेंडर काढून ही लस विकत घेण्यात येणार असल्यामुळे शहरातील लसीकरण मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेने अशा प्रकारे ग्लोबल टेंडर काढून लसीकरण करण्याबाबत ‘लोकमत’नेही सातत्याने पाठपुरावा केला होता. याचीच पालकमंत्र्यानी दखल घेत हे ग्लोबल टेंडर काढण्याबाबतची सूचना पालिका प्रशासनाला केली होती.
ठाणे महानगरपालिकेने सातत्याने कोविड नियंत्रण मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. विक्रमी वेळेत एक हजार १०० खाटांच्या ठाणे ग्लोबल हॉस्पिटलची उभारणी केली. तितक्याच क्षमतेचे कोविड रुग्णालय पार्किंग प्लाझा येथे उभारले आहे. या रुग्णालयांच्या माध्यमातून ठाणे शहरासह परिसरातील असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले.
औषधे असोत किंवा ऑक्सिजन याबाबतीत ठाण्याने नेहमीच स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता लसीकरण मोहीमही गतिमान आणि व्यापक करण्यासाठी ठाणे महानगरपालिका मुंबईच्या धर्तीवर पाच लक्ष लसी विकत घेणार आहे.
पालकमंत्री शिंदे यांनी मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेने पाच लक्ष लसी विकत घेण्याची सूचनाही केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने लस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तात्काळ ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी आरोग्य विभागाल्या दिल्या आहेत. आता या निर्णयामुळे ठाणे शहरातील लसीकरण मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे.
......................