ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणो महापालिका आता सज्ज झाली आहे. त्यानुसार आता गृहविलगीकरण बंद करण्यात आले असल्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका २२ अलगीकरण केंद्र सज्ज करणार आहे. त्याठिकाणी तब्बल १२ हजार बेड्सची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच रुग्णालयात ५४४८ च्या वर बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.ठाणे शहरात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. त्यानुसार आता शहर देखील पूर्वपदावर येऊ लागले आहे. परंतु येत्या दोन ते तीन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने पार्कीग प्लाझा येथे लहान मुलांसाठी बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्होल्टास, बुश कंपनी येथील कोविड सेंटरही सुरु करण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच १० कोटींचा ३५० प्रकारांचा औषध साठादेखील पालिकेने खरेदी केला आहे. ऑक्सिजन प्लान्ट उभारणी बरोबर इतर संस्थांकडून ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वीच राज्यातील १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद करण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पालिकेने आता तयारी सुरु केली आहे.२२ अलगीकरण केंद्रांची तयारी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असतानाही रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तिसरी लाट आल्यास नेमकी परिस्थिती कशी असेल याचा अंदाज पालिकेलादेखील नाही. परंतु तरीदेखील आता गृहविलगीकरण बंद करण्यात आल्याने पालिकेने पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी २२ अलगीकरण केंद्र सुरु करण्याची तयारी पालिकेने केली आहे. हे केंद्र जून अखेर पर्यंत सज्ज ठेवले जाणार आहेत. यामध्ये शाळा, महापालिकेच्या इमारती, रेंटलच्या इमारती, आदींचा समावेश असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी तब्बल १२ हजार बेड्स निर्मिती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच त्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून १५ टीम सज्ज केल्या जाणार आहेत. याशिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ५ हजार ४४८ बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यातही आता व्होल्टास आणि बुश कंपनी येथील कोवीड सेंटरचाही भरणा पडणार आहे. एकूणच कोरोनाची तिसरी लाट आल्यास रुग्णांना बेड, औषधे, ऑक्सिजनचा साठा कमी पडू नये यासाठीची तयारी पालिकेने दोन महिने आधीपासूनच केल्याचे दिसून आले आहे.पालिका सज्जकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज आहे. मुबलक औषधसाठा, ऑक्सिजन, पीपीई कीट, लहान मुलांसाठी बेड, तसेच गृहविलगीकरण बंद करण्यात आल्याने २२ अलगीकरण केंद्राच्या माध्यमातून १२ हजार बेड अशा रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा