ठाणे : एकीकडे ठाणे शहराचे सुशोभिकरण सुरू असून नव्या उद्यानांना कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे प्रशस्त जागेत असलेल्या उद्यानाची दुरावस्था आहे. ठाणे महानगरपालिकेला हिरानंदानी विकासकानी सन २०१२ रोजी हिरानंदानी मेडोज येथे कन्स्ट्रक्शन टीडीआर अंतर्गत उद्यान विकसित करून दिले होते. पण हे उद्यान गेल्या दहा वर्षापासून बंद स्थितीत असल्याचे मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी निदर्शनास आणलेले आहे. शहरातील पालिकेच्या उद्यानाची देखभाल-दुरूस्ती करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत.
हिरानंदानी मेडोज येथील उद्यान शेवटची घटिका मोजत आहे. या उद्यानातील अनेक वस्तूंची नासधूस झाली असून गेली अनेक वर्ष हे उद्यान बंद असल्यामुळे धर्मवीरनगर परिसरात बीएसयुपी योजने अंतर्गत राहणाऱ्या गरीब नागरिकांना तसेच या परिसरातील लहान मुलांना है उद्यान वापरता येत नाही. सध्या या उद्यानाला जाण्याचा मार्गच नसून हिरानंदानी विकासकाला महापालिकेने २०१४ ला स्वतंत्र गेट बांधण्याच्या सूचना करण्यात आली होती. मात्र विकासकाने उद्यानाला असलेल्या मार्गावर गेट लावून बंद केला आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या २० ते २५ हजार नागरिकांना या उद्यानात जाण्यास अटकाव केला जात आहे. ‘गेली अनेक वर्ष हे उद्यान बंद असल्यामुळे मुलांना परिसरात खेळण्यासाठी दुसरे उद्यान नाही. पालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी हे उद्यान खुले करावे असे येथील स्थानिक नागरिक आशा गिरी सांगतात.’
धर्मवीर नगर परिसरात उद्यान अथवा मैदान नसल्यामुळे नागरिकांना एकमेव असलेल्या या उद्यानातही जाण्यास विकासक मज्जाव करत आहे. यावर पालिका कोणतीच कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. सध्याच्या सेंट्रल पार्क प्रमाणेच दहा वर्षांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून हिरानंदानी मेडोज येथे हे उद्यान साकारले होते. मात्र आता ही जागाही बळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर सुशोभिकरण करून नागरिकांना खुले करावे, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
आयुक्त बांगर यांची २०२२ सालची घोषण अजून कागदावरच
ठाणे शहरात विविध ठिकाणी मियावाकी पद्धतीने फॉरेस्ट बनून कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावले जातील. त्या झाडांची तसेचउद्यानाची निगा व देखभाल महानगरपालिका करेल असे अश्वासन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी २०२२ साली दिले होते. हिरानंदानी मेडोज येथील असलेल्या उद्यानामध्येही मियावकी फॉरेस्ट बनून यांची स्वच्छता निगा व देखभाल राखण्याचे काम पालिकेच्या वतीने केले जाईल असे सांगण्यात आले होते, पण गेल्या दोन वर्षापासून असे इथे काही झालेले दिसून आले नाही.