ठाणे : पार्किंगचे दर आणि ठिकाणेही अंतिम झाल्यानंतर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत. परंतु, ज्या ठेकेदाराला पार्किंगचे काम देण्याचे निश्चित झाले होते, त्याने सात ते आठ महिन्यांची मुदत देऊनही बँक गॅरंटी न भरल्याने अखेर पालिकेने त्याचा ठेका रद्द केला आहे. त्यानुसार, आता यासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेचे पार्किंग धोरण आणखी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल नऊ हजार ८५५ वाहने पार्क होऊ शकणार आहेत. त्यानुसार, दरही दीड वर्षापूर्वीच महासभेत मंजूर झाले आहेत. तसेच पार्किंगची ठिकाणेही अंतिम झाल्यानंतर शहरातील बहुतेक ठिकाणी पालिकेने पिवळे पट्टेदेखील मारले होते. आता पुसले गेले आहेत. तसेच रात्रीच्या पार्किंगची संकल्पनादेखील पालिकेने पुढे आणली होती. परंतु, ती सुरू केव्हा झाली व बंद केव्हा केली, याचा थांगपत्ता ठाणेकरांना लागला नाही.पार्किंगसाठी महापालिकेने अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये रस्ते निश्चित केले आहेत. त्यानुसार, अ वर्गात २९, ब वर्गात ५०, क वर्गात ३० आणि ड वर्गात ५७ रस्त्यांचा समावेश आहे. पालिकेने हे धोरण तयार केल्यानंतर ज्या ठेकेदाराला पार्किंगचे काम देण्यात आले होते, त्याने सुमारे आठ महिने उलटूनही बँक गॅरंटी न दिल्याने अखेर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पालिका पुन्हा नव्याने यासंदर्भात निविदा काढणार आहे. परंतु, त्यालादेखील साधारणपणे महिनाभराचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
पार्किंग धोरणाची निविदा नव्याने काढणार, ठाणे महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:49 AM