ठाणे : कोरोनाचा वाढता आलेख पाहता महापालिकेच्या महासभा ऑनलाइन वेबिनार पद्धतीने घेतल्या जात होत्या. परंतु, या महिन्याची महासभा गडकरी रंगायतन किंवा डॉ. घाणेकर नाट्यगृहात घेणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. दोन्हीपैकी सोयीचे ठिकाण दोन ते तीन दिवसांत निश्चित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात कोरोनाची लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. कोरोनाच्या काळात सर्वच कामकाज ठप्प होते. त्यामुळे महासभा ऑनलाइन वेबिनारद्वारे घेतल्या जात होत्या. त्यामुळे एका दिवसात महासभा संपत होती. परंतु, या महासभेत प्रशासनाच्या विषयांवर चर्चा करता येत नसल्याचे मत भाजपच्या काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते.
चुकीचे विषय मंजूर करण्याचा घाट अशाप्रकारे घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे गडकरी किंवा घाणेकर सभागृहात महासभा घेण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. ते शक्य नसल्याचे सत्ताधारी शिवसेना आणि पालिकेने स्पष्ट केले होते.