ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील प्लास्टर आॅफ पॅरीसचे छत कोसळल्याची घटना घडल्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असा दावा पालिकेने केला होता. परंतु, तो फोल ठरला असून जुलैमध्ये या नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी ज्या ठेकेदाराने हे काम पीपीपीवर केले होते, त्यालाच हे काम दिले असून यासाठी पालिका एकही पैसा खर्च करणार नाही. परंतु, हे काम पूर्ण होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने पालिका यापासूनच्या दोन कोटींहून अधिकच्या उत्पन्नाला मुकणार आहे. २५ एप्रिलला रात्री १२.१० च्या सुमारास प्लास्टर कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचे अहवालात उघड झाले होते. दरम्यान, एक महिन्यात या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते नाट्यप्रेमींच्या सेवेत हजर होईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दिली होती. परंतु, आज वर्ष उलटत आले, तरी नाट्यगृहाचा पडदा उघडलेला नाही. दरम्यान, दुरुस्तीचे काम पुन्हा त्याच ठेकेदाराकडून करण्याचा अट्टहास पालिकेने केला होता. त्याने नकार दिल्याने अखेर पालिकेनेच ते हाती घेण्याचे ठरवले. त्यानुसार, तसा प्रस्ताव तयार करून यासाठी २४ लाख ८३ हजारांचा खर्च होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, या कामाच्या निविदाही अंतिम झाल्या होत्या. परंतु, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मध्यस्थी करून पहिल्या वेळेस ज्या ठेकेदाराने या नाट्यगृहाचे काम केले होते. त्यालाच ते देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, नोव्हेंबरच्या मध्यानंतर ते सुरू झाले आहे. त्यानंतर, हे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी जाईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु, तो फोल ठरला आहे. पालिकेला या नाट्यगृहापासून महिनाकाठी १३ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. गडकरी रंगायतनपेक्षा ते अधिक आहे. असे असतानाही या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे पालिकेला दोन कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
ठाणे महापालिकेचे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार
By admin | Published: April 09, 2017 2:44 AM