ठाणे : पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुरामुळे अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
भातसा नदीतील पुराच्या पाण्यासोबत पानवेली व गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरास चार ते पाच दिवसापासून कमी पाणीपुरवठा होत आहे. कचरा काढण्यासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. स्टेम वॉटर डिस्ट्री. ॲण्ड इन्फा. कं.प्रा.लि. यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, पवारनगर, आझादनगर या भागात सुरू राहणार आहे. दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राचा काही भागाचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.