ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा अखेर संपला असल्याचे महापालिकेने मान्य केले आहे. दरम्यान, पालिकेनं वेळीच त्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी हलवलं आहे. परंतु आता पार्कीग प्लाझा येथील रुग्ण ग्लोबलला हलविण्यात आल्याने तेथेदेखील ताण वाढला आहे. तसेच येथील ऑक्सिजनची क्षमतादेखील कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने महापालिकेचे व्होल्टास येथील कोविड सेंटरही अद्यापही सुरु करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून महापालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.ठाणे शहरात आतापर्यंत ९४ हजार २६ कोरोनाबाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतार्पयत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १४६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याच्या घडीला १५ हजार १९७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरदेखील आता अपुरे पडू लागले आहेत. अशातच पार्कीग प्लाझा कोविड सेंटर मधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याने येथील २६ रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयावरील ताण वाढला आहे. त्यातही रविवारी देखील पालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे पार्कीग प्लाझा येथील ऑक्सीजनचे बेड सुरु झालेले नाहीत. पालिकेने संबधींत कंपनीकडे मागणी करुनही पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
त्यातही कल्याण डोंबिवली या भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील रुग्ण देखील ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरवरील ताण वाढू लागला आहे. परंतु आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ग्लोबल मधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयासाठी २० केएल रोजच्या रोज ऑक्सिजनची गरज लागत आहे. तर पार्कीग प्लाझा येथे १३ आणि व्होल्टासला देखील १३ केएलची ऑक्सिजनची गरज रोजच्या रोज गरज लागत आहे. सध्या ग्लोबलाच २० केएल उपलब्ध असून रोजच्या रोज त्याचा वापर होत आहे. परंतु आता पार्कीग कोविड सेंटरला ऑक्सिजन न आल्याने येथील ऑक्सिजनचे बेड बंद करण्यात आले आहेत. तर व्होल्टास येथील कोवीड सेंटरलादेखील ऑक्सिजनची गरज असल्याने ते देखील सेंटर पालिकेला सुरु करता आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पालिकेने संबधित कंपनीला ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु तो अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यातही सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यक तो पुरवठा न झाल्यास भविष्यात ऑक्सिजनचे बेड बंद करण्याची वेळ पालिकेवर येण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची भीती पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.