ठाणे : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट आहे, परंतु गणेशोत्सवाची पंरपरा खंडीत होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवस साजरा करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाने व महापालिकेने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर केले.ठाणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, उपआयुक्त तथा गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अशोक बुरपल्ले, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे, मंडळाचे कार्यवाह आर. के. पाटील, सचिव, पी. एच.पाटील, खजिनदार संजय माने आदी उपस्थित होते.ठाणे महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील जागेत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा दीड दिवस साजरा करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या प्रांगणात कृत्रिमरीत्या केलेल्या व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नसून अत्यंत साधेपणाने हा उत्सव करण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ठाणेकरांनी सुद्धा यंदाचा गणेशोत्सव महापालिकेने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.
ठाणे महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांचा : नरेश म्हस्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:56 PM