ठाणे : येत्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता मान्सुनचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणा:या प्रत्येक आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेने मोर्चे बांधणी केली असून त्यानुसार साधनसामुग्री आदींसह इतर व्यवस्था चोख ठेवण्याची तयारी पालिकेने केली आहे. यासाठी बोटी, लाईफ जॅकेट आदींसह इतर साहित्यही उपलब्ध करुन घेण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सुनपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सक्षम करण्यात आला आहे. येथे ऑन डय़ुटी २४ अशा पध्दतीने कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. याशिवाय आपतकालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन, टोल फ्री क्रमांक आदी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपध्दती देखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शोध व बचावकार्यासाठी बोट, जेसीबी, लाईफ ज्ॉकेट, लाईफ बॉईज आदी साहित्य घेण्यात आले आहे. तसेच १२ फायर इंजिन, ५ इमरजेन्सी टेंडर, ८ वॉटर टेंडर, ३ जम्बो वॉटर टेंडर, क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल ८, जीप, टर्न लेबर लॅडर आदींसह इतर व्यवस्था अग्निशन विभागाकडून सज्ज ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देखील लाईफ जॅकेट १५, लाईफ बॉय १५, रबरी बोट , प्रशिक्षित व सुटका गट ४, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आर.डी.एम. सी. जॅकेट आदींसह इतर साहित्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच एखाद्यावेळेस पावसाळ्यात मोठी आपत्ती झाली तर त्यावेळेस देखील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे यासाठी महापालिकेच्या मालकीच्या १० व खाजगी मालकीच्या १६ बोट अशा एकूण २६ बोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तर शहरात ६ ठिकाणी पजर्न्यमापक यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. तर एखाद्या वेळेस आपत्ती ओढवल्यानंतर तेथील नागरीकांची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यासाठी १३ ठिकाणी रात्र निवारे सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकही सज्ज करण्यात आले आहे. या टीममध्ये १ अधिकारी आणि ३३ ठोक पगारावर कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पावसाळ्यात उद्भवणा:या आपत्तकालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. तसेच आवश्यक त्या बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय आदींसह इतर साहित्य देखील उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.- संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा