ठाणे महापालिकेकडून दरमहिना विविध बाबींसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. यामध्ये पाणी खरेदी, घंटागाडी योजना, रस्ते साफसफाई, सुरक्षारक्षक, शिक्षण विभाग, इंधन खर्च, विजेचा खर्च, स्मशानभूमी, कळवा रुग्णालय साफसफाई, कर्ज परतफेड आदींसह इतर खर्च धरुन दरमहिना पालिकेकडून ३२ कोटींच्यावर निधी खर्च होत आहे.
जीएसटीच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचा पगार
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांवर ३२ कोटींचा खर्च होत असताना, दुसरीकडे शासनाकडून पालिकेला दरमहा ७५ कोटींचे जीएसटीचे अनुदान प्राप्त होत आहे. त्यातूनच पालिका कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात असल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
८०० कोटींची बिले द्यायची कशी?
ठाणे महापालिकेवर सध्याच्या घडीला ३२०० कोटींच्यावर दायित्व आहे. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून २०१८ पासून शहरात विविध स्वरुपाची कामे करण्यात आली आहेत. परंतु त्याची बिले काढण्यासाठी पालिकेकडे पैसा शिल्लक नाही. पालिकेच्या माध्यमातून २०१८-१९ मध्ये केलेल्या कामांची १०० टक्के बिले अदा केल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१९-२० मध्ये केलेल्या कामांची २५ टक्के याप्रमाणे बिले काढली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु एवढे करून पालिकेला ८०० कोटींची बिले अदा करायची असल्याची माहिती समोर आली आहे.