ठाणे : कळवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली असतानाच गुरुवारी दिव्यातील पालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ३९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही मुले सहावी इयत्तेत शिकत असून, त्यांच्यावर सध्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यातील ११ मुलांना पोटदुखीचा त्रास वाढला असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते. मात्र, खिचडीचा दर्जा तपासला जात नाही. त्यात पाल असल्याचा दावा येथील स्थानिक रोहिदास मुंडे यांनी केला आहे. तीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली आणि त्यातून त्यांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास झाला. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४४ विद्यार्थ्यांना याचा त्रास जाणवला. त्यानंतर तत्काळ याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ठाणे पालिकेकडून डॉक्टरांचे पथक शाळेत दाखल झाले. यावेळी सहा डॉक्टरांचे पथक, दोन नर्स आणि तीन रुग्णवाहिका खबरदारीच्या दृष्टीने शाळेत दाखल झाल्या. त्यांनी या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. या ३९ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवत होता.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून, संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण किचनची व परिसराची पाहणी केली, असे त्यांनी नमूद केले.