ठाणे - एकीकडे मालमत्ता कराची वसुली नियमितपणे होत असतांना दुसरीकडे पाणी कराची वसुली मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी चांगली झाली आहे. ही वसुली वाढविण्यासाठी नळ संयोजन खंडीत करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार १० मार्चपर्यंत पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या १३५ कोटींच्या टारगेटपैकी १०३ कोटींची वसुली केली आहे. तर ३८५ च्या आसपास नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहेत. एकीकडे मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मालमत्ता कर विभागाची तारेवरची कसरत सुरु आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची वसुली वाढविण्यासाठीसुध्दा आता युध्द पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांनासुध्दा लोकसभा निवडणुकीचे काम लागल्याने वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी यंदा १० मार्च पर्यंत १०३ कोटींची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांकडून ९० कोटी, व्यावसायिक ग्राहकांकडून १०.३१ कोटी आणि इतर २.३० कोटी अशी एकूण वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत १२२ कोटींची वसुली झाली होती. दरम्यान वसुली करण्यात आलेल्या विभागात माजिवडा अव्वल ठरला असून येथून १२.६४ कोटींची वसुली झाली आहे. त्या खोलाखाल वर्तकनगर भागातून १२.१४ कोटी, नौपाडा ८.८५ कोटी, उथळसर ८.६२ कोटी, लोकमान्य नगर ८.१२ कोटी, चितळसर मानपाडा ६.४४ कोटी, वागळे ७.८८ कोटी, कळवा ४.२८ कोटी, दिवा ३.९७, शिळ १.८२, मुंब्रा ४.२४, कौसा ३.१९, विटावा २.०१, कोपरी ३.३१, खारेगाव ३.४३, बाळकुम २.१८, कोलशेत १७ लाख ५७ हजार अशा प्रकारे वसुली करण्यात आली आहे. तर थकबाकी असलेल्या ३८५ च्या आसपास ग्राहकांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आले आहे. त्यांच्याकडे दिड कोटींच्या आसपास थकबाकी होती अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाने केली १०३ कोटींची वसुली, ३८५ नळ संयोजन खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 4:08 PM
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगली वसुली केली आहे. तर ३८५ नळ संयोजने खंडीत केली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले.
ठळक मुद्देमाजिवड्यातून १२.६४ कोटींची विक्रमी वसुलीकोलशेत भागातून १७.५७ लाखांची वसुली