पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे पालिका सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:55 AM2018-09-12T02:55:19+5:302018-09-12T02:55:38+5:30
‘ पर्यावरणभिमुख गणेशोत्सव’ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे महापालिकेची यंत्रणा याही त्यासाठी सज्ज झाली आहे.
ठाणे : ‘ पर्यावरणभिमुख गणेशोत्सव’ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे महापालिकेची यंत्रणा याही त्यासाठी सज्ज झाली आहे. या वर्षीही पर्यायी विसर्जन व्यवस्थेसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून नागरिकांनी या पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी पारसिक रेतीबंदर व कोलशेत येथे विसर्जन महाघाट हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टिकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेशमूर्र्तींबरोबरच ५ फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने आरती स्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले विसर्जन घाट भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच बांधण्यात आले आहेत.
>कृत्रिम तलाव
विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला दोन कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी, आंबेघोसाळे तलाव, नीळकंठ वूड्स टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे कृत्रिम तलाव व खारेगाव येथेही तलाव निर्माण करण्यात आले आहेत. येथे भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
>विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती
दीड दिवसाचा, पाच, सात आणि दहा दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षारक्षक, अग्निशमन दल, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरूद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.
>सीसी कॅमेरे व विद्युत व्यवस्था
विसर्जन महाघाटासह कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या ठिकाणी विद्युत व्यवस्थाही केली आहे.
>मूर्ती स्वीकृती केंद्रे
विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांवर विसर्जन करणे शक्य नसलेल्या भक्तांसाठी मडवी हाउस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदिर, चिरंजीवी हॉस्पिटल, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाइप लाइन ब्रीज, १६ नं. पाइपलाइन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका येथे मूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात येणार आहेत.