ठाणे : कळव्यातील शांतीनगर परिसरातील मेहरुनिसा शेख (६०) या महिलेच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीवर कारवाईसाठी स्थानिकांनी सोमवारी सकाळी कळवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी सांगितले.शुक्रवार, १९ जानेवारी २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास मेहरुनिसा हिचा मृतदेह तिच्या शांतीनगरातील घरात मिळाला होता. याच परिसरात राहणारा ओंकार पवार हा शुक्रवारी पहाटे संशयास्पदरीत्या तिच्या घराबाहेर घुटमळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळल्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु, या महिलेच्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू किंवा खुनाबाबत काहीही आढळले नाही. तसेच पवार विरुद्ध आणखी काही तथ्यता न आढळल्यामुळे पोलिसांनी चौकशीअंती त्याला सोडले. केवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आढळल्याने स्थानिकांनी त्याच्यावर संशय व्यक्त करत त्याच्या अटकेसाठी कळवा पोलीस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढला. या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला. संबंधित संशयित आरोपीवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच मृत महिलेला न्याय मिळावा, असे निवेदन शांतीनगर रहिवाशांनी कळवा पोलिसांना दिले.याप्रकरणी महिलेच्या अकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल आहे. वैद्यकीय अहवालात कुठेही तिला मारल्याच्या किंवा तिच्या खुनाबाबतच्या खाणाखुणा नाहीत. संशयिताची चौकशी केली. पण, प्राथमिक चौकशीत तरी तथ्यता न आढळल्यामुळे त्याला सोडून दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. पवार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तिच्या घराजवळ तो आढळला असला, तरी तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आहे. या प्रकरणात सर्वच बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.कोण आहे पवार ?ज्या ओंकार पवार याच्यावर स्थानिकांचा संशय आहे, त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल आहे. तीन वर्षांपूर्वीच तो एका खुनाच्या जामिनावर सुटला आहे. याव्यतिरिक्तही त्याच्यावर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.प्रथमदर्शनी तरी या महिलेचा खून झाल्याचे आढळलेले नाही. त्यासंबंधी महिलेच्या नातेवाइकांनाही तशी कल्पना दिली आहे. डॉक्टरांनी मृत्यूचे स्पष्ट मत अद्याप दिलेले नाही. सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपी आढळला असल्याने त्यादृष्टीनेही चौकशी सुरू आहे.-डॉ. डी.एस. स्वामी,पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
ठाणे : महिलेचा गूढ मृत्यू; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:30 AM