सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात दिवाळी आधी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता वाढत आहे. दिवाळीनंतरच्या आठ दिवसांत चार हजार ४१२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक ठाणे शहरात एक हजार १५२ तर नवी मुंबईत एक हजार २७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात दिवाळीच्या काही दिवस आधी ३०० ते ३५० रुग्ण दिवसभरात सापडत होते. मात्र, भाऊबीजेनंतर त्यात दररोज १०० रुग्णांची भर पडत आहे.
आठवड्यात चार हजार ४१२ रुग्णांची भर झाल्यामुळे जिल्ह्यात दोन लाख २४ हजार १६१ रुग्ण झाले आहेत. यात ठाणे व नवी मुंबईत या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मात्र या शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही उत्तम आहे. ठाणे शहरात आठवड्यात एक हजार ७५ रुग्ण बरे झाले आहेत. या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईत ८१७ रुग्ण बरे झाले असून १९ रुग्णं दगावले आहेत. एका आठवड्यात केडीएमसी हद्दीत ९५१ रुग्ण वाढले असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३९९ रुग्ण वाढले, तर आठ रुग्ण दगावले. ग्रामीण भागात ३५५ रुग्णे आठवड्यात वाढले असून १० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात १६० रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
दिवाळीनंतर ८५ मृत्यू जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या आठवड्यात ८५ मृत्यू झाले आहेत. यात ठाणे शहरात सर्वाधिक २५ रुग्ण, नवी मुंबईत १९, कल्याण-डोंबिवली परिसरात १५ रुग्ण दगावले आहेत. यापेक्षा कमी म्हणजे दहा रुग्ण ग्रामीण भागात आणि मीरा-भाईंदर परिसरात आठ मृत्यू झाले आहेत.
ठाण्यात दिवाळीनंतर रुग्ण वाढत आहेत. याआधी शहरात रुग्ण तपासणीचे प्रमाण दिवसाला दोन हजारांपर्यंत होते. आता ते सहा हजारांपर्यंत असल्यामुळे रुग्ण निश्चित करणे शक्य झाले आहे. दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता नाही.-डाॅ. विपिन शर्मा, आयुक्त, ठामपा
त्याच भागात रुग्ण वाढण्याचे कारणठाणे शहरात दिवाळीआधी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी सारखी वर्दळ होती. या गर्दीच्या कालावधीत मास्क लावणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. याशिवाय सामाजिक अंतर पाळण्याचा अभाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची वाढ दिसून येत आहे.