ठाणे : ठाण्यातून नवीमुंबईत रिक्षाने कुठेही जायचे असेल तर प्रवाशाला दिवसाही दीडपट भाडे मोजावे लागते. येताना प्रवासी मिळत नाहीत. असे कारण सांगितले जाते. याबाबत कोणताही शासकीय अथवा युनियनचा निर्णय नसला तरी रिक्षावाल्यानी छुप्या रीतीने संगनमताने प्रवाशांची लूट चालवली आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओ याबाबत ध्रृतराष्ट्र झाले आहेत. ठाणे स्थानकाच्या पश्चिमेलाही प्रवाशांची रिक्षांसाठी भली मोठी रांग असते. परंतु रिक्षा एकही नसते. त्याचवेळी डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला रिक्षांची रांग असते. व त्यांचे चालक स्थानकाच्या प्रवेशद्वारी उभे राहून लांबच्या अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांना हेरत असतात. यामुळे प्रवाशांचा खोळंबा आणि वाहतूक कोंडी घडते तरी वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. रिक्षावाल्यांच्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात ट्रॅफीकही जाम होेते. मात्र हे प्रश्न नक्की कोणी सोडवावेत यात आरटीओ आणि वाहतूक पोलिसात संभ्रम निर्माण झाला आहे.ठाणे शहरात एकूण १७ हजार ५०० रिक्षांचे परमिट आहेत. तसेच महिन्याला अनेक नवीन रिक्षांची नोंदणी केली जाते. मात्र तरीही काही रिक्षा-चालक व मालकांकडे इरादापत्र नसल्यास किंवा जर १६ वर्षापूर्वीची रिक्षा असल्यास वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाला कळवावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी असे मत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. तर वाहतूक पोलीस हा मुद्दा आणि त्यावरील कारवाई ही बाब परीवहन अधिकाऱ्यांच्या कक्षेत असल्याचे सांगून आपले हात झटकून टाकत आहेत. याबाबत रिक्षा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकाही रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)
ठाणे-नवीमुंबई रिक्षाभाडे दिवसाही मोजा दीडपट
By admin | Published: July 08, 2015 12:08 AM