ठाणे : ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे पालिकेचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा ठाण्यात लागलेल्या बॅनरवरून रंगली आहे. वाढदिवसाला लागलेल्या बॅनरवरून ठाण्यात चर्चेला उधाण आलं आहे. ठाणे शहरात लागलेल्या काही बॅनरवर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे आहेत तर काही बॅनरवर अजित पवार यांचा मोठा बॅनर आहे.
मुंब्र्यात लागलेल्या बॅनरवर मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघाचा शिंदे गटाचा पुढचा उमेदवार ठरल्याची चर्चा संध्या ठाण्यात रंगली आहे. कळवा मुंब्रा भागात आव्हाड याना प्रचंड जनाधार आहे त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाला जोरदार शह दिल्याचा पाहिलं आहे. परिणामी या मतदारसंघात चंचुप्रवेश करता यावा यासाठी शिंदे गटाने राष्ट्रवादीचाच मोहरा गळाला लावला आहे.
एका गंभीर प्रकरणात तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदेनी नजीब मुल्ला यांना मदत केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या मदतीची परतफेड असल्याचं बोललं जात आहे. मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हाडांच्याच विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा डाव शिंदेनी आखला असल्याचं बोललं जात आहे. मुस्लीम मतांच्या विभागणीसाठी शिंदे गटाला मुल्ला यांची मदत होऊ शकते अशीही चर्चा आहे.