लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आघाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांवरील वृत्तनिवेदक आणि मुलाखतकार यांची ‘मुलाखतकारांची मुलाखत’ हा कार्यक्रम कोर्टनाका टाउन हॉल येथे ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता रंगणार आहे. उद्घाटन ठामपाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार असून कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष कवी डॉ. महेश केळुस्कर उपस्थित राहतील. टीव्हीच्या झगमगीत पडद्यावर ब्रेकिंग न्यूजच्या फ्लॅशमध्ये अनेक चेहरे रोज दर्शकांशी बोलत असतात. आयुष्यातील वैयक्तिक सुखदु:खे बाजूला ठेवून, हसरा चेहरा घेऊन, बातमी देणाऱ्या या चेहऱ्यांमागे नेमके काय दडलेले असते? अनेक वेळा मुलाखत घेताना नेमके काय कसब लागते? वृत्तवाहिन्यांच्या वाढणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या चेहऱ्यांना नेमके काय करावे लागते? करिअर म्हणून हे क्षेत्र कसे आहे? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. या प्रश्नांचा उलगडा यात होणार आहे. याप्रसंगी वृत्तनिवेदिका सुवर्णा जोशी, रचना विचारे, विनायक घोडे, वैभव कुलकर्णी, भूषण करंदीकर आणि मिलिंद भागवत हे वृत्तनिवेदन आणि मुलाखतीमधील अनेक किस्से, गमतीजमती सांगत हा प्रवास उलगडणार आहेत. यांच्याशी पत्रकार प्रशांत डिंगणकर आणि कवी बाळ कांदळकर संवाद साधणार आहेत. या विनामूल्य कार्यक्र मास जास्तीतजास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप ठाणे शाखेच्या अध्यक्षा मेघना साने, कार्याध्यक्ष सदानंद राणे, सहकार्यवाहक आरती कुलकर्णी, कोषाध्यक्ष राजेश दाभोळकर यांनी केले आहे.
ठाण्यात वृत्तनिवेदकांची मैफल रंगणार ३ जूनला
By admin | Published: May 30, 2017 5:48 AM