नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाइन पोर्टल साईट बंद असल्याने भिवंडीतील शेकडो बांधकाम कामगार शासनाच्या विविध योजनां पासून वंचित राहत असल्याने कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे कार्याध्यक्ष विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वेताळ पाडा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो महिला व कामगार सहभागी झाले होते.
राज्य शासनाकडून इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र मंडळाच्या ८ नोव्हेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्यात आला असून इतर ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये याबाबतची जनजागृती नसल्याने कामगारांना अर्ज करतांना अनेक अडचणी येत असून ऑनलाइन पोर्टल बंद असल्याने अनेक ईमारत व इतर बांधकाम कामगार अर्ज करण्यापासून व राज्य शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
ऑनलाइन पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, राज्य शासनाने आश्वासन दिलेले पाच हजार रुपये दिवाळी बोनस सुरू करण्यात यावे, कामगारांना वार्षिक दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, कामगारांना घरगुती भांडी मिळण्यासाठी योजनेचा लाभ देणारे ऑनलाइन पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, या व अशा विविध मागण्यांसाठी 'आयटक'चे कॉ. विजय कांबळे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन भिवंडी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आले.
आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ११ डिसेंबरला मुंबईतील कामगार कल्याणकारी मंडळ सचिवालयावर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी कॉम्रेड विजय कांबळे यांनी दिला आहे.