- जितेंद्र कालेकर ठाणे - शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने गिरीश कुकरेजा (४२) या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची ७६ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुकरेजा यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी बुधवारी दिली.
नौपाडा भागात राहणाऱ्या कुकरेजा यांच्या मोबाईल क्रमांकावर ११ फेब्रुवारी २०२४ रोजी एका सायबर भामटयाने संपर्क साधला होता. त्यांना एका व्हॉटसअॅप ग्रृपवर समाविष्ट केले होते. यामध्ये सात ते आठ जण या गृपचे अॅडमिन होते. यातील सर्व गृप मेंबर हे शेअर मार्केटसंबंधी चर्चा करीत होते यातील बरेच जण हे आपल्याला शेअर मार्केटमधून कसा चांगला परतावा मिळाला, याचीच माहिती देत होते. कुकरेजा यांनाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्याने त्यांनीही याच गृपवर पैसे कसे गुंतवणूक करायचे? याची विचारणा केली. त्यावेळी यातील एका गृप अॅडमिनने आधी कंपनीचे एक अॅप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल, अशी माहिती दिली.
त्याबातची एक लिंकही लगेचच याच व्हॉटसअॅप गृपवर टाकण्यात आली. त्यानुसार व्हेंचुरा सेक्युरिटीज हे अॅप त्यांनी त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड केले. त्यानंतर हा गृप बंद होणार असल्याचे सांगत २७ एप्रिल २०२४ रोजी व्हेंचूरा प्राफिट या अन्य एका व्हॉटसअॅप गृपवर समाविष्ट केले. त्यांना पुन्हा दुसरेच अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ११ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ या कालावधीमध्ये या दोन्ही अॅपवर त्यांना दिलेल्या विविध बँक खात्यांवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून ७६ लाख ७५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक केलेली ही रक्कम किंवा जादा परतावाही त्यांना परत करण्यात आला नाही. वारंवार या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी कुकरेजा यांनी ९ जुलै २०२४ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.