ठाणे : कोविड प्रतिबंधक लसीकरण हे ठाणे शहरात सुरळीत व जलद गतीने सुरू आहे. बुधवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून, दिवसाला १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. शेवटच्या नागरिकापर्यंत लस पोहोचविणे हा आमचा उद्देश असून, संपूर्ण एमएमआरडीए हद्दीत ५ लाख लसीकरणाचा टप्पा गाठणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. महापालिका कार्यक्षेत्रातील आनंदनगर येथील लसीकरण केंद्रावर महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देऊन लसीकरण कामाचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रात जवळजवळ ५० ते ५५ केंद्रे सुरू आहेत.
ठाण्यामध्ये सिनेसृष्टीतील कलावंत तसेच मान्यवर व्यक्ती खासगी लसीकरण केंद्रावर न जाता महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगला संदेश जात आहे. बुधवारी आनंदनगर लसीकरण केंद्रावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी लसीकरण करून घेतले. त्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले. लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी यांचेही महापौरांनी कौतुक करून आभार व्यक्त केले.
..............आनंदनगर लसीकरण केंद्रांवर अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने कोणतीही गर्दी न करता नागरिक लसीकरण करून घेत आहेत. स्वत: महापौर हे या केंद्रावर उपस्थित राहून सर्व काळजी घेत आहेत. नेता आणि सामान्य माणूस यामध्ये खूप अंतर असते, असं अनेकांना वाटतं. परंतु महापौर म्हस्के हे शहराचे प्रथम नागरिक असले तरी त्यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते, असे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने यावेळी सांगितले.