- अनिरुद्ध कुलकर्णीपुण्यात अवयवदानाबाबत जेवढी जागृती झालेली आहे, तेवढी ती मुंबई, ठाणे या शहरांत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदानाकरिता लागणारा वेळ येथपासून जो अवयव दान करू तो पुढच्या जन्मात मिळणार नाही, अशा अंधश्रद्धांपर्यंत अनेक कारणांमुळे लोक पुढे येत नाहीत. ठाणे जिल्ह्यातील अवयवदानाबाबतच्या परिस्थितीचा १३ आॅगस्टच्या ‘अवयवदान जागृती दिना’निमित्त आढावा घेणारा लेख...अवयवदानाचे महत्त्व प्रचंड आहे. परंतु, अवयवदानाविषयी असलेली अनभिज्ञता, सामाजिक बंधन, अंधश्रद्धा आणि भीती यामुळे ठाणे जिल्ह्यात अवयवदानाचे प्रमाण पाच टक्केही नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. कोणते अवयव दान करावे, अवयवदानाची प्रक्रिया याविषयी जाणून घेण्यास लोक धजत नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, ठाण्यात पुरेशी जागृती नाही. असंख्य लोक अवयवदानाविषयी जनजागृतीचे काम करत आहे. परंतु, अनेक जण घाबरतात, मी अमुक एक अवयव दान केला, तर पुढच्या जन्मी तो अवयव मला मिळणार नाही, ही अंधश्रद्धा लोकांमध्ये आहे. बाकी समाज काय म्हणेल, हा मोठा न्यूनगंड त्यांच्या मनात असतो. जनजागृती कार्यक्रम आयोजित करूनही पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नाही. यकृत, फुफ्फुस, किडनी, डोळे, हृदय, त्वचा, हाडे, नेत्रपटल, स्वादुग्रंथी, जठर यासारख्या अवयवांचे दान करता येते. ठाणे जिल्ह्यात २० टक्के लोक किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. पाच ते दहा टक्के लोक लिव्हरच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे लिव्हरचा पेशंट भारतात कोठेही रजिस्टर होऊ शकतो. फुफ्फुसासाठी तीन ते चार टक्के लोक प्रतीक्षेत आहेत. सर्वाधिक दान लिव्हर, किडनी आणि नेत्रांचे होत आहे. अवयवदानाविषयी लक्षणीय जागृती आजही नाही. लोक मागे हटतात. अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी किमान १५ ते २० तास लागतात. परंतु, नातेवाइकांना तातडीने मृत व्यक्तीचा देह ताब्यात हवा असतो. या कारणामुळे अवयवदानासाठी बरेचजण पुढे येत नाहीत. खरंतर, अवयवदान हा सांस्कृतिक विचार आहे. अवयवदानामुळे चार लोकांचे आयुष्य वाचणार आहे, हे जेव्हा काहींना पटते, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. हॉस्पिटलवर असलेला विश्वास, अवयवदानाचे वितरण कसे होते हे स्पष्ट कळते, तेव्हा मोजकेच लोक अवयवदानासाठी पुढे येतात. मात्र, लोक स्वत:हून सरसावत नाहीत, हीच खंत आहे. अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगण्यात डॉक्टर आणि समन्वयकांची भूमिका महत्त्वाची असते. ज्याला अवयवदान करायची इच्छा आहे, तो सविस्तर माहिती विचारतो, शंकांचे निरसन करून घेतो. मात्र, काही लोकांपुढे अवयवदानाचा केवळ विषय जरी काढला, तरी त्यांचा पारा चढतो. काहींच्या बाबतीत त्यांचे नकारार्थी विचार सकारात्मक होऊ शकतात. अवयवदानाबाबत असा तीन प्रकारांचा प्रतिसाद देणारी माणसे आढळून येतात. लोकांच्या घरात हळद, मुंज, लग्न, बारसं यांची चर्चा होते, परंतु अवयवदानाविषयी कधीही चर्चा होत नाही. शासनाने डोनरकार्ड काढले आहेत, पण तीही भरली जात नाहीत. मृत्युपत्र लिहिले जाते, पण डोनरकार्ड भरून ठेवतीलच, असे नाही. डोनरकार्ड भरणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असून १०० लोकांपैकी केवळ तीन ते चार लोक ते भरतात. मानवीय अंगप्रत्यारोपण अधिनियम हा अवयवदानाचा कायदा १९९४ साली आला. त्यानंतर, या कायद्याच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या. सध्या प्रत्यारोपण करणारी नोंदणीकृत हॉस्पिटल ही २०१४ च्या सुधारित कायद्यांतर्गत कार्यरत आहेत.(लेखक ठाण्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये समन्वयक आहेत)अवयवदान करून आपल्या मृत्यूनंतरही आपण जगू शकतो, म्हणून अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीने अवयवदान केले, तर त्यामुळे आठ जणांना जीवनदान मिळू शकते. भारतात प्रत्येक महिन्याला किडनीसाठी तीन हजार लोक प्रतीक्षेत आहेत. किडनी न मिळाल्याने दररोज १३ लोकांचा मृत्यू होतो. २०१४ मध्ये संपूर्ण भारतात किडनीच्या प्रतीक्षेत ४७६१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३६७० रुग्ण किडनीची प्रतीक्षा करून कमकुवत झाले आणि त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. अवयवासाठी खूप मागणी आह,े पण अवयवदान त्या तुलनेत प्रचंड कमी आहे. मुंबई, ठाण्यात झोनल ट्रान्सप्लाण्ट को-आॅर्डिनेशन कमिटी २००१ साली सुरू झाली. त्याचे आॅफिस सायन हॉस्पिटलमध्ये आहे. ठाण्यात फक्त एकाच खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण केले जाते. या हॉस्पिटलमध्ये ४० किडन्या आणि ३५ लिव्हरचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. अवयवदानाच्या जागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत. परंतु, लोक कार्यक्रमाला जात नसल्याने त्यांना अवयवदानाची माहिती मिळत नाही आणि पुरेशी माहिती नसल्याने ते अवयवदानासाठी पुढे येत नाहीत.- डॉ. विद्या कदम (किडनी स्पेशालिस्ट)अवयवदानाविषयी असलेली भीती आणि अपूर्ण माहितीमुळेच अवयवदानासाठी कोणी पुढे येत नाही. माझ्याकडे आजपर्यंत सव्वा लाख लोकांनी फॉर्म भरले आहेत. अवयवदानाविषयी आपल्या देशात कठोर नियमावली नाही. अवयवदानामध्ये दोन किडन्या, त्वचा, नेत्र, फुफ्फुस, हृदय, यकृत या अवयवांचे दान करता येते. जिवंतपणी लिव्हर, किडनी दान करता येते. आपल्या देशातील नियमानुसार हे अवयव नातेवाइकांना आपण दान करू शकतो. यकृत खराब झाले असेल आणि त्याला त्याच्या नातेवाइकाने यकृतातील काही भाग दान केला, तर कालांतराने दोघांच्याही यकृताची १०० टक्के वाढ होते. तसेच, जिवंतपणी नातेवाइकांना एक किडनी देऊन तुम्ही एका किडनीवर आनंदाने आयुष्य जगू शकता. हृदय बंद पडून मृत्यू झाल्यास मृत्यूनंतर सहा ते आठ तासांत नेत्र व त्वचादान करता येते, तर ब्रेन डेड झाल्यावर मृत्यूनंतर दोन किडन्या, त्वचा, नेत्र, फुफ्फुस, हृदय, यकृत हे सर्व अवयव दान करता येतात.- विलास ढमाले (अवयवदान चळवळीचे प्रणेते)
ठाणे तेथे अवयवदानात उणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 2:22 AM