- अजित मांडके ठाणे - ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ - २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशांना नोटीस बजावण्याचे काय कारण असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या नोटीस मागे घेतल्या नाही तर मात्र आम्ही आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. येत्या २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. परंतु त्या आधीच शरद पवार गटातील पदाधिकाºयांना विना कारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. काही पदाधिकाºयांना नोटीस बजावल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मुळात ज्यांच्यावर हत्या, मोक्कका सारखे आरोप आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींवर नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्याचा एवढाच गुन्हा आहे की तो निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार आहे, त्यामुळेच त्याच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीसा बजावल्या जात नाहीत. केवळ अशा पध्दतीने टारगेट करुन त्याला ऐन निवडणुकीच्या काळात घराबाहेर काढण्याचाच हा प्रयत्न असून पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, करा तुम्हाला काय कारवाई करायची आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
या संदर्भात निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी अन्यथा उलटी पावले उचलावी लागतील, वेळ प्रसंगी बंद पाळावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एकतर्फी नोटीस बजावण्यात आली असून त्याची साधी बाजू देखील पोलिसांनी ऐकून घेतली नाही, हे देखील चुकीचे आहे. उलट यातून जनतेत प्रक्षोभ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचेही ते म्हणाले.
आधीच गर्दीमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. मात्र बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. तुम्ही सर्व सीट जिंकणार आहात, तर मग कशाला हवा रोड शो असा सवालही त्यांनी केला.