सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बहूभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारने घोषणा करताच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) ठाणे व पालघर जिल्ह्यांतील थकबाकीदार ३० हजार खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार ठेवली आहे. यामध्ये सुमारे २००९ पासून आजपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८२८ शेतकऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीच्या आदेशाचे परिपत्रक येताच निकषानुसार पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्र्जमाफी देण्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल. याशिवाय, नवीन कर्ज देण्याच्या आदेशाचेदेखील पालन करू, असे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यात १४ हजार ८२८ शेतकऱ्यांना १०३ कोटी १६ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यात आठ हजार ८३२ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ६१ कोटी तीन लाख रुपयांचा लाभ होणार आहे. पाच हजार २५८ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३६ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ होईल. बहूभूधारक असलेल्या ७३८ शेतकऱ्यांना पाच कोटी सात लाखांची कर्जमाफी होणार आहे. पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांनादेखील १०३ कोटी ६५ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. यातील तीन हजार ७५४ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना २४ कोटी ६१ लाखांचे, तर अल्पभूधारक सहा हजार ६५३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी होईल. बहूभूधारक पाच हजार २५९ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासन आदेशात लागू होणाऱ्या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीला पात्र ठरवण्यात येणार आहे. यासाठी टीडीसीसी बँकेचे आदेशाकडे लक्ष लागले आहे. आदेश आल्यानंतर विलंब लागू नये, म्हणून बँकेने आधीच ५० हजारांचे कर्ज घेण्यापासून ते एक लाख आणि दीड लाखाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी निश्चित केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार केवळ पीककर्ज माफ होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पिकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहेत. भातपिकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहे. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.
ठाणे-पालघरची कर्जमाफी २०६ कोटींची
By admin | Published: June 13, 2017 3:24 AM