ठाणे: ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई (१) केंद्रातून स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या ‘आदिम’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. सोमवारी मुंबई (१) केंद्राचा निकाल जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली. प्राथमिक फेरीतून मुंबई (१) केंद्रातून ठाण्याच्या आदिम नाटकाने मुंबईत बाजी मारली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या नाटकाचे लेखन लेखा त्रैलोक्य, दिग्दर्शन दुर्गेश आकेरकर, नेपथ्य कल्पेश पाटील, प्रकाशयोजना योगेश केळकर, संगीत सुनिता फडके, वेशभूषा वंदना परांजपे, रंगभूषा केदार ओटवणेकर, रंगमंच व्यवस्था गजानन साप्ते यांची आहे. नम्रता सावंत (चंदा), राधिका भट (वसु), नेहा पाटील (बेला), सुनिल तांबट (सुहास) या कलाकारांनी यात भूमिका केली आहे. या प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे द्वितीय पारितोषिक दुर्गेश आकेरकर, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाचे प्रथम पारितोषिक योगेश केळकर, अभिनयाचे रौप्य पदक नम्रता सावंत व सुनिल तांबट तर अभिनयाचे प्रमाणपत्र राधिका भट यांना प्राप्त झाले आहे. अडीच तासांचे हे नाटक स्त्री - पुरूष नातेसंबंधावर आधारीत आहे. गेली दोन महिने या नाटकाचा सराव केला होता. अंतिम फेरीच्या सरावाचा श्री गणेशा तारिख जाहीर झाल्यानंतर करणार असल्याचे या नाटकाचे दिग्दर्शक आकेरकर यांनी सांगितले. आकेरकर यांनी दिग्दर्शन केलेले हे दुसरे नाटक आहे याआधीही राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या मस्तानी नाटकाने ठाणे केंद्रातून बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला होता. ६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे या स्पर्धेत एकूण २० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुहास जोशी, रवि फलटणकर, सुनिता पाटणकर यांनी काम पाहिले.