जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसह दहा गुन्हे अन्वेषण विभागांच्या पथकांनी गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी पहाटे १ या अवघ्या चार तासांच्या अवधीतच ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम राबविली. याद्वारे बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांसह १६६ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली.
ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशनुसार कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २९ डिसेंबर रोजी रात्री ते ३० डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील सर्व स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहा पथकांमधील २३४ अधिकारी आणि एक हजार ७० अंमलदार अशा एक हजार ३०४ कर्मचाºयांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ, मुंब्रा, कळवा आदी परिसरात राबविलेल्या कोंबिंग आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांची चौकशी करण्यात आली.
या दरम्यान, अवैद्य शस्त्र बाळगणारे पाच, मुंबई ठाण्यातून हद्दपार केल्यानंतरही मोकाट फिरणारे १२ आरोपींना अटक करण्यात आली. नऊ जुगाºयांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार नऊ गुन्हे दाखल झाले. त्याव्यतिरिक्त दारूबंदी कायद्यानुसार ५२ आरोपींची धरपकड करण्यात आली. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर गांजा, चरस, अफिंग, एमडी पावडर असे अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाºया २० जणांवर कारवाई करुन १९ गुन्हे दाखल केले. या कारवाई अंतर्गत ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आदी परिसरातील महाविद्यालय परिसर, बंद कंपन्या, तलाव परिसर, रेल्वे ब्रिज, बस स्टॉप, पडक्या इमारती, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या आणि झोपडपट्टी तसेच हॉटेल, लॉजेस, डान्सबार आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
तीन 'वॉन्टेड' आरोपीही जेरबंद- या कारवाईमध्ये गुटखा विक्री करणारे तिघे, वॉन्टेड आरोपी तीन आणि अजामीनपात्र वारंट बजावूनही हजर न होणारे नऊ अशा १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त गणेश गावडे, शिवराज पाटील आणि नवनाथ ढवळे आदी अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.