लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता तसेच कोणत्याही अधिकृत विद्यापीठाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण न करता डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अरुण वैती (५९, रा. शीळगाव, ठाणे) आणि निहाल शेख (४६, शीळ, ठाणे) या दोन तोतया डॉक्टरांविरुद्ध डायघर पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. त्यांच्याकडून बनावट प्रमाणपत्रे, लेटरपॅड, शिक्के आणि औषधे अशी मोठी सामग्रीही हस्तगत करण्यात आली आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने ६ फेब्रुवारी २०२० रोजी अलोक सिंह (३९) याच्यासह आठ तोतया डॉक्टरांना कळवा परिसरातून अटक केली. त्यांच्याकडूनही स्टेथोस्कोपसह औषधे तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रेही हस्तगत केली होती. या कारवाईपाठोपाठ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, डॉ. हेमांगी घोडे तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी शुभांगी भुजबळ यांच्यासह संयुक्त कारवाई करून ७ फेब्रुवारी रोजी शीळगावातील दोन रुग्णालयांवर छापे टाकले. या छाप्यांत कथित डॉक्टर अरुण वैती आणि निहाल शेख या दोघांकडे आधी एक डमी रुग्ण पाठविण्यात आला. त्याच्यावर या डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यांच्या अंगझडतीमध्ये लेटरपॅड, बोगस प्रमाणपत्रे आणि औषधे पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे शीळ-डायघर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही तोतया डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव, सहायक पोलीस निरीक्षक ब्रिजेश शिंदे, प्रदीप सरफरे, गोविंद आरळेकर, विशाल चिटणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि पोलीस हवालदार संतोष शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कोणतेही प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी रुग्णालय थाटून लोकांच्या जीवाशी खेळणा-या शीळगावातील अरुण वैती आणि निहाल शेख या दोन तोतया डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली आहे. अशा प्रकारे कोणीही यापुढे रुग्णांची फसवणूक केल्यास त्यांच्याविरुद्ध कसलीही तमा न बाळगता कारवाई केली जाणार आहे.चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डायघर पोलीस ठाणे