लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरला असलेल्या पीसीआर कार आता ठाणे पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत. एखाद्या घटनेबाबत नियंत्रण कक्षाकडे कॉल गेल्यास किंवा नियंत्रणकक्षाने कॉल दिल्यानंतर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही पोलीस ठाण्याचे पथक आता अवघ्या सहा ते आठ मिनिटांमध्ये प्रतिसाद देईल आणि योग्य ती कारवाई करेल, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यात दिली.ठाणे पोलिसांच्या ताफ्यात नवीन पीसीआर दोनच्या (पोलीस नियंत्रण कक्षाची व्हॅन) ३५ कार आणि १० अतिरिक्त लाईट व्हॅनचे वाटप झाले. या नव्या कोऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून माथूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या तुलनेत ठाणे पोलिसांकडे या वाहनांची कमतरता होती. शिवाय, आधी ठाणे आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ दोन जीप आणि एक पीसीआर व्हॅन होत्या. परंतु, पोलीस ठाण्यांतील कामकाजांमध्ये ही वाहने अपुरी पडत होती. त्यामुळे प्रतिसादाचा वेळ कमी होणार असून, अधिक परिणामकारक गस्त घालणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील गैरप्रकार नियंत्रणात येतील. पोलीस नियंत्रण कक्षाला एखाद्या नागरिकाने अनुचित घटनेची माहिती दिली तर ते तात्काळ या पीसीआर व्हॅनला कॉल देतील. हा कॉल मिळताच पीसीआर व्हॅन मदतीला येणार असल्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत करणेही पोलिसांना शक्य होणार आहे. शिवाय, दुचाकी वाहनांचीही कायदा सुव्यवस्थेसाठी मदत होणार आहे.गस्तीसाठी उपयोगदोन कोटी २७ लाख ५० हजारांमध्ये ३५ वाहनांची खरेदी झाली आहे. या कारमध्ये जमादारासह चार कर्मचारी दिवसा आणि रात्र गस्तीसाठी तैनात राहणार आहेत. यामध्ये प्रथमोपचार साहित्यासह एसएलआर, गॅसगन, १२ बोअर रायफल अशी शस्त्रसामुग्रीही असेल. प्रत्येक वाहनात एक टॅब बसविला असून, त्याद्वारे वाहनाचे लोकेशन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना स्क्रिनवर दिसणार आहे. तसेच घटनास्थळाचे फोटो काढून व्हॉटसअॅपच्या माध्यमातून ते नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्याची सुविधाही यात आहे. त्यामुळे न्यायालयात पुराव्यासाठीही त्यांचा उपयोग होणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.
ठाणे पोलिसांनाही वाहनबळ!
By admin | Published: May 26, 2017 12:09 AM