ठाणे: ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार रामना मेंगाळ यांनी दक्षिण अफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित केलेल्या कॉमरेड मॅरेथाॅन स्पर्धेत यंदा सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी कामगिरी केली आहे. मेंगाळ यांनी ११ तास २८ मिनिटे आणि २२ सेकंदामध्ये अप हिलचे ८५.९१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले.
मेंगाळ हे वाहतूक शाखेच्या कापूरबावडी युनिटमध्ये नेमणूकीला आहेत. डर्बन येथे ९ जून २०२४ रोजी पार पडलेल्या या मॅरेथाॅनमध्ये जगभरातील धावपटून सहभाग घेतला हाेता. याच स्पधेर्त मेंगाळ सहभागी झाले हाेते. ही स्पर्धा यशरित्या पूर्ण करुन त्यांनी ठाणे शहर पोलिस दलाचे आणि महाराष्ट्राचे नाव लौकिक केल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सांगितले. अतिशय खडतर आणि प्रतिष्ठेच्या या मॅरेथाॅनमध्ये नावलौकिक मिळविणारे ठाणे शहर पोलिस दलातील मेंगाळ हे पहिलेच कर्मचारी ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस आयुक्तालयाच्या वतीने त्यांचा सत्कारही केला जाणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.