लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : देशभरातील कुख्यात सोनसाखळी चोरटे, भूलथापा देऊन फसवणूक करणाऱ्यांसह अन्य गुन्हेगारांची आश्रयदाती असलेली दिल्लीतील रहिवासी, फातिमा उर्फ मामा जाफरअली या महिलेच्या शोधासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. आंबिवलीचा मोस्ट वाँटेड सोनसाखळी चोरटा नासीर हाफीज खान यालाही तिनेच आश्रय दिला होता.ठाणे, मुंबई, कल्याणसह अनेक भागांत नासीरने सुमारे ७३ गुन्हे केले आहेत. त्याला दिल्ली येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ५ मे रोजी जेरबंद केले होते. ठाणे न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. फातिमाने तिच्याच मुलीशी नासीरचा विवाह करून देऊन, त्याला दिल्लीतील घरी आश्रय दिला होता. केवळ नासीरच नव्हे, तर मुंबई, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश अशा देशभरातील कुख्यात सोनसाखळी चोरट्यांकडून चोरलेल्या मालाच्या कमिशनच्या बदल्यात तिने अनेक चोरट्यांना तिच्याकडे आश्रय दिला होता. तिचा नेमका ठावठिकाणा मिळाला नसला, तरी त्यांची जाण्या-येण्याची ठिकाणे, राहण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांचा तपशील ठाणे पोलिसांना मिळाला आहे. याच माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरीविरोधी पथकातील एक सहायक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी आता दिल्लीला रवाना झाले आहेत. आणखी चौकशी सुरूनासीरने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील केवळ सात गुन्ह्यांचीच कबुली दिली. त्याच्याकडे आणखी चौकशी करण्यासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडीचीही मागणी न्यायालयाकडे केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
फातिमाच्या शोधात ठाणे पोलीस दिल्लीला
By admin | Published: May 29, 2017 4:42 AM