ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडुन मिळणारे ४.८१ कोटी पोलीस अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले आहे. परंतु आजच्या घडीला देखील पोलिस खात्याकडून २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी येणे शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाज पत्रकात ही बाब समोर आली आहे. ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३१३ बस असून त्यातील १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनचे प्रवासी इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबरोबर खाजगी बसने पळविले असले तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या आसपास गेले आहे. परंतु दुसरीकडे परिवहनला विविध बाबींकडून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ठाणे पोलिसांच्या थकबाकीचा देखील समावेश होतो. पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रवास खर्चापोटी पोलीस ग्रॅन्ट परिवहन सेवेकडे प्राप्त होत असते. २०१०-११ ते २०१७-१८ या कालावधीत पोलीस ग्रन्ट ही २२ कोटी ८८ लाख एवढी असून ती पोलीस खात्याकडून अद्याप प्राप्तच झाली नसल्याची माहिती परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात नमुद केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मिळावी म्हणून परिवहन सेवेने पोलिस खात्याकडे वारंवांर पत्रव्यवहार सुध्दा केला आहे. परंतु अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नसल्याची माहिती परिवहन सुत्रांनी दिली आहे. परंतु मार्च २०१६ पर्यंत या रकमेपैकी ५ कोटी ८१ लाख व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख परिवहन सेवेकडे प्राप्त होतील असे अपेक्षित धरण्यात आले होते. त्यानंतर यंदा सादर झालेल्या परिवहनच्या मुळ अंदाज पत्रकात मार्च १९ पर्यंत या शिल्लक रकमेपैकी ३ वर्षांची ४ कोटी १३ लाख परिवहनला प्राप्त होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. यातील किती रक्कम परिवहनला प्राप्त झाली याचा उल्लेख झालेला नाही. मागील वर्षी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडुन मिळणारे ४.८१ कोटी पोलीस अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले आहे. परंतु आता तर २२ कोटी ८८ लाखांची देणी अद्यापही शिल्लक असून ती वसुल करण्यासाठी परिवहनला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
ठाणे पोलिसांनी थकविले परिवहन सेवेचे २२ कोटी ८८ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:29 PM
ठाणे परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडून मिळणारे २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी अद्यापही परिवहन सेवेने येणे शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देकेवळ ४ कोटी ८१ लाखांची देणी मिळालीआर्थिक वर्षात ४ कोटी १३ लाखांची देणी मिळण्याची आशा