ठाणे : मखमली तलाव ते ठाणे रेल्वेस्थानक असा प्रवास करत असताना रिक्षात विसरलेल्या बॅगेत साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने हरवले होते. याप्रकरणी भार्इंदर येथील रहिवासी शांता शेट्टे (६८) यांनी तक्रार दाखल करताच ठाणेनगर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ही बॅग शोधून त्यांना ती मुद्देमालासह परत केली. आपले मौल्यवान दागिने परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मीरा-भार्इंदर रोड येथील हर्ष अपार्टमेंटमधील रहिवासी शांता या १५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मखमली तलाव ते ठाणे रेल्वेस्थानक असा रिक्षाने प्रवास करत होत्या. याच प्रवासामध्ये आपली दागिने आणि एक हजारांची रोकड असलेली बॅग त्या रिक्षातच विसरल्या. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार त्यांनी दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची निर्मिती केली होती. कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. त्यात एका रिक्षावर एकता फायनान्स असे लिहिलेले आढळले. या फायनान्स कंपनीकडून पोलिसांनी रिक्षाची माहिती मिळवली. माहितीसह रिक्षाचालकाचा फोटोही पोलिसांना मिळाला. तक्रारदार शांता यांनीही फोटोच्या आधारे त्याला ओळखले. त्यानंतर, तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला असता, रामकिरण यादव (रा. वाघोबानगर, कळवा) असे नाव उघड झाले. अथक परिश्रमातून यादवचा शोध घेऊन त्याच्या ताब्यातून साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. ती बॅग नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या हस्ते ती शांता यांना सुखरूपपणे सोमवारी सुपूर्द केली. दागिने कोणाकडे द्यायचे, याची योग्य माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती बॅग सुरक्षितपणे ठेवल्याचा दावा यादव याने पोलिसांकडे केला.