ठाणे : ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच ठाणेकरांची सुरक्षितता जपण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज आहेत. पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असून चांगली वाहनेही आहेत. त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करून सामान्य जनतेचे रक्षण करा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलिसांना विजयादशमीच्या निमित्त बुधवारी केले.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयात दसऱ्यानिमित्त पोलीस आयुक्त सिंग यांनी पोलिसांच्या शस्त्रागारातील शस्त्रांचे परंपरेनुसार विधिवत सपत्नीक पूजन केले. यावेळी पोलीस आयुक्तांनी अधिकारी आणि अंमलदारांना शुभेच्छा दिल्या. आगामी सणोत्सव आणि निवडणुकांच्या काळात कोणतीही परिस्थिती उद्भवली तर पोलिसांनी सज्ज राहून कायदा-सुव्यवस्था हाताळावी. सामान्य नागरिकांना आधार आणि गुंडांना धाक वाटेल, असे कर्तव्य पार पाडा, असा सल्लाही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला.
या शस्त्रांचे झाले पूजन
पोलीस आयुक्तांनी मुख्यालयाच्या मैदानावर दहशतवादी विरोधी कृत्यांसाठी वापरण्यात येणारी नऊ एमएम कार्बाईन मशीन गन, एमपी- ५ - काबाइन मशीन गन, एके ४७, एलएमजी आणि दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी १२ बोअर तसेच सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) आदी शस्त्रांचे पूजन केले. त्याच वेळी हीरो मोटर्सच्या सीएसआर निधीतून दिलेल्या ५२ मोटारसायकली तसेच इतर वाहनांचेही पूजन केले.
यावेळी सह पोलीस आयुक्त दतात्रय कराळे, प्रशासन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, मुख्यालयाचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे, गणेश गावडे, सहायक आयुक्त उत्तम कोळेकर, प्रदीप कन्नलू, नासीर पठाण, पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी, मोटर वाहन निरीक्षक नासीर पठाण, राखीव उपनिरीक्षक शामकुमार चव्हाण आणि तिलकचंद कांबळे उपस्थित होते.