ठाणे : ठाणे शहर पोलिस भरतीसाठी आलेल्या साताऱ्याचा उमेदवार साहिल सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित औषधाचे (Tab Jefcort 6 Mg ) सेवन केल्याचे साकेत पोलिस मैदानावर झालेल्या चाचणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा कलम २२३ सह औषधी द्रव व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८ (सी), २७ नुसार राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे शहर आयुक्तालयात भरतीसाठी १९ जून २०२४ पासून मैदानी चाचणी सुरू आहे. साकेत पोलिस मैदान १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. चाचणी सुरू झाली. सकाळी ७:४५ वा. प्रमुख असलेल्या महिला पोलिस हवालदार साबळे यांनी दोन उमेदवारांना नैसर्गिकविधीकरिता सोडले. मैदानावर उपस्थित असलेल्या डॉ. शशिकांत भागवत यांना रॅपर दाखवले असता, सानप याने प्रतिबंधित औषध घेतल्याचे त्यांनी सांगितले.
साहिल सानप याने त्यावेळी कोणती तरी गोळी खाल्ल्याचे त्याच्यासोबत असलेल्या उमेदवाराने साबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. सानप याला विचारले असता अंगात कणकण असल्याने गावाकडून येताना औषधाच्या दुकानातून आणलेली अंगदुखीची गोळी खाल्ल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने हवालदार साबळे यांनी सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील यांना माहिती दिली. पाटील यांच्या सूचनेवरून गोळीच्या रॅपरचा शोध घेतला असता त्याने टॅब जेफक्रॉट ६ एमजी गोळी खाल्ल्याचे समोर आले.