ठाणे: शरीर विक्रयाच्या व्यवसायातून दोन तरुणींची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री सुटका केली आहे. याप्रकरणी सुकेश शेट्टी (२६, रा. कर्नाटक), सुरेश बन्सल (२३, रा. मध्यप्रदेश) आणि बबलू उर्फ राज सोराफअली गाईन (३२, रा. पश्चिम बंगाल )या तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पश्चिम बंगालच्या धुडीआटनोंबर (जि. दखीन) येथील बबलू याने पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधील अनुक्रमे २४ आणि २६ वर्षीय या दोन पिडीत तरुणींना ठाण्यात आणून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, कल्याणी पाटील आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील काटई जकात नाका परिसरात असलेल्या ‘साईश्रद्धा लॉजिंग अॅन्ड बोर्डींग’ येथे २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बनावट गिºहाईकाच्या मदतीने छापा टाकला. तिथे ग्राहकांकडून बबलू या दलालाने पैसे स्विकारल्यानंतर या दोन तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेतांना बबलूसह तिघांना या पथकाने अटक केली. याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून लॉजचा चालक मंजूनाथ शेट्टी आणि सतिश शेट्टी या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, त्यांनी आणखी कोणत्या मुलींना या अनैतिक व्यवसायात अडकविले? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.