ठाणे : शहरातील नौपाडा भागातून शनिवारी अचानक चोरीस गेलेली दापोली (जि. रत्नागिरी) येथील एक रुग्णवाहिका अवघ्या तीन तासांत नौपाडा पोलिसांनी शोधली. दापोली येथे तातडीने जायचे असल्यामुळे या रुग्णवाहिकेच्या चालकाने ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.संदीप सुधाकर केळकर (४०, रा. बाजारपेठ, दापोली) हे २० सप्टेंबर रोजी दापोली येथे जात असताना त्यांच्या रु ग्णवाहिकेच्या इंजीनमध्ये अचानक आवाज आला. त्यामुळे त्यांनी नौपाडा येथील गुरुद्वारासमोरील मुंबई-अहमदाबाद पूर्व द्रुतगती मार्गावर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ती उभी केली. त्यानंतर कोपरी येथील एका हॉटेलमध्ये ते विश्रांतीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते रुग्णवाहिका घेण्यासाठी गेले. मात्र, तिथे कुठेही ती आढळली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी यासाठी दोन पथके तयार केली. ठाणे शहराच्या बाहेर जाणाºया रस्त्यावर शोध घेतला असता, ती माजिवडा येथील मासळी बाजाराजवळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आढळली. ती तिथे कोणी आणि कशी नेली, याचा मात्र उलगडा झाला नसून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या तीन तासांत रु ग्णवाहिकेचा शोध घेणाºया नौपाडा पोलिसांचे त्यांनी आभार मानले.
ठाणे पोलिसांनी घेतला तीन तासांमध्ये रुग्णवाहिकेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:44 AM